मुंबई, दि. १ (पीसीबी) – समृद्धी महामार्ग मागील काही अपघातांमुळे दिवसांपासून सतत चर्चेत आहे, आजवर अनेकांनी या महामार्गावर झालेल्या अपघातात जीव गमावला आहे. दरम्यान आज, १ जुलै रोजी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ लाख रुपयांची मदत देऊन हा प्रश्न सुटणार नसल्याचे म्हटले आहे.
समृद्धी महामार्गावर सतत अपघात होत आहेत. हे मागील काही महिन्यात सातत्याने पाहायला मिळत आहे. मी त्या भागात गेल्यावर या रस्त्याने जावं म्हणून मी माझा मार्ग बदलून तेथे गेलो. त्या रस्त्याने जाताना एका ठिकाणी गर्दी होती म्हणून गाडी थांबवली. एरवी त्या रस्त्यावर लोकही भेटत नाहीत. तेव्हा त्या लोकांना त्यांचा अनुभव विचारला.
तेव्हा लोकांनी सांगितले की, या रस्त्याची राज्यभर चर्चा झाली, उदोउदो झाला. पण आम्हला सतत्याने अपघात बघायला मिळत आहेत आणि कदाचित या रस्त्याचे वैज्ञानिकरित्या नियोजन केलेलं नसावं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून लोक मृत्यूमुखी पडत आहेत, असे लोकांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.
लोकांनी सांगितले की, आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद-दुसरा अपघात झाला आणि कोणाचा मृत्यू झाला तर लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. त्यामुळे हा महामार्ग बांधताना निर्णय घेण्यात, त्याचं नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत न कळत हे लोक दोषी ठरवतात, असे शरद पवार म्हणाले.











































