समृद्धी महामार्गावर १०० पेक्षा अधिक खिळे ठोकून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार

0
2

दि.१० (पीसीबी) -मुंबई समृद्धी महामार्ग सध्या चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री (९ सप्टेंबर) खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावर १०० पेक्षा अधिक खिळे ठोकण्यात आले होते. या खिळ्यांमुळे याठिकाणावरून जाणारी अनेक वाहनं पंक्चर झाली तर काहींचे टायर फुटले. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी खिळे ठोकल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला होता. पण आता यामागचे खरे कारण बुधवारी(दि.१० सप्टेंबर) समोर आले आहे.

वास्तविक, रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीनेच हे खिळे ठोकले होते, अशी माहिती समोर आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना बॅरिकेडिंग का केले नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्री हे खिळे काढून टाकण्यात आले. ते दिवसा काढले असते तर लोकांना हा त्रास झालाच नसता. रात्री बारा ते तीन या वेळेत अनेक गाड्या पंक्चर झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. रात्री ४ तास समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. चोरट्यांनी गाड्या अडवून लुटण्याचे प्रकार यापूर्वीही समृद्धी महामार्गावरील सांगवी भागात घडले असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, या घटनेमागे कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडिया अनेकांनी याचा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर नेमका हा प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरातील ही घटना घडली. जर पुलाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते तर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी बॅरिकेड्स का लावले नाही? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्यूअन्सर डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वर मोठा कट रचून जीवीतहानीचा प्रयत्न…100 पेक्षा जास्त खिळे रस्त्यावर ठोकून समाजकंटकांनी अनेक जीवांशी खेळण्याचा प्रयत्न केला…महामार्ग पोलिस व प्रशासन मात्र अरेरावी करत ऊलट प्रवाशांवर आवाज चढवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत…’

प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार….

दरम्यान, या प्रकरणात संबंधित प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार सतत उपाययोजना करत असल्याचा दावा केला जातो, पण अशा घटनांमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमावली लागू करणे, देखरेख वाढवणे आणि काम करणाऱ्या कंपन्यांवर सतत नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या या महामार्गावरून नागरिकांचा विश्वास उडेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते