समाज संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी साहित्यिकांचे मोठे योगदान – तानाजी सावंत

0
168

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – हजारो वर्षांपासूनची संस्कृती आणि इतिहास, कवी, लेखकांमुळे आजपर्यंत टिकून आहे, साहित्य समाजाचा आरसा आहे, रामायण, महाभारत व सिंधू संस्कृतीचा इतिहास कवींमुळे जीवंत आहे, अशा साहित्यिकांच्या पाठीशी सह्याद्री सारखा मी उभा राहील, असे प्रतिपादन सार्वजनिक कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले.

पुणे केंब्रिज शिक्षण समुहाच्या वतीने पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन पुण्यात आंबेगाव पठार येथे उत्साहात पार पडले. या संमेलनाचे उदघाटन मंत्री श्री सावंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ गोरे, छत्रपती व्यंकोजी राजे यांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले, ज्येष्ठ नाट्य अभिनेते वसंत अवसरीकर, संगीतकार हर्षित अभिराज, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भुजबळ, सौ छायाताई कुंजीर, संस्थेचे सचिव मयूर कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे, अभिनेता प्रकाश धिंडले, बाळुतात्या यादव, संदीप बनकर आदी उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष डॉ प्रा चंद्रकांत कुंजीर, निमंत्रक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी संमेलनाचे संयोजन केले. संमेलन पार पाडण्यासाठी प्रा स्मिता कुलकर्णी, प्रा दगडे, प्रा भापकर, प्रा पाटील, स्वीटा डिसुझा यांनी जबाबदारी पार पाडली.

श्री सावंत पुढे म्हणाले, मराठी साहित्य आणि माझा तसा फार संबंध नाही, मी अभियांत्रिकी क्षेत्रात काम केले आहे, समाज संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी साहित्यिकांनी मोठे योगदान दिले आहे, ग्रामीण भागात साहित्य संमेलने भरविणा-या साहित्य संस्था व साहित्यिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीन. जयवंतराव शिक्षण संस्थेला लवकरच विद्यापीठाचा दर्जा मिळणार असून संस्थेचा उपग्रह लवकरच आकाशात झेपावणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ गोरे म्हणाले, साहित्य लेखनाला ग्रामीण भागात अनेक विषय आपणांस वावरताना मिळतात, माझ्या फेसाटी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, माझा जगण्याचा संघर्ष म्हणजे फेसाटी आहे, या कादंबरीने मला नोकरी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली, जत सारख्या दुष्काळी भागात माझे लहानपण गेले. दारिद्र्य अनुभवत भविष्याचा वेध घेतला. स्वागताध्यक्ष डॉ कुंजीर यांनी दरवर्षी युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येईल असे सांगितले.

दशरथ यादव म्हणाले, राज्यात साहित्य लेखनाला मदत करण्याची धारणा सरकार मध्ये नाही, सोळा वर्षे सतत साहित्य संमेलन घेणा-या साहित्य संस्थांना शासन मदत करीत नाही, ठराविक संस्थाना मदत केली जाते, हे सगळे बदलायला हवे, इतर साहित्य संमेलनाला सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे, ग्रामीण मातीचे वास्तव साहित्यात येण्याची गरज असून, खेड्याची संस्कृती साहित्यात उतरली पाहिजे.साहित्याची बीजे ग्रामीण भागातच आहेत. फक्त ती रुजविण्यासाठी प्रतिभेचा अविष्कार हवा. माणसाच्या जगण्याला बळकटी देणारे सत्यावर आधारीत मानवतावादी साहित्य निर्माण झाले तर समाज अधिक बलशाली होईल.

यावेळी सीताराम नरके यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, सकाळी अकरा वाजता केंब्रिज शिक्षण संस्थेच्या वतीने ग्रंथ दिंडी काढण्यात आली. भजनी मंडळ सहभागी झाले होते, पारंपरिक वेषात विद्यार्थी सहभागी झाले होते. दुपारी युवकां समोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला. या मध्ये प्रा योगेश्री कोकरे, प्रकाश धिंडले यांनी सहभाग घेतला.अश्विनी दिक्षित यांनी मी सावित्री बोलते हा नाट्य प्रयोग सादर केला. सूत्रसंचालन सुजाता निंबाळकर यांनी केले, आभार दिपक पवार यांनी मानले.