पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कार्यक्षमतेची झेप घेताना महिला तसेच उपेक्षित घटकांमध्ये असलेला दुर्दम्य उत्साह त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनविण्यासाठी महत्वाचा असतो. ध्यासपूर्ण आयुष्य जगत असताना प्रोत्साहन आणि पाठींबा मिळाल्यास ते उत्तुंग भरारी घेऊ शकतात. अशा विविध गरजू घटकांच्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी महापालिका नेहमीच कृतिशील राहिली आहे. ही प्रक्रीया अधिक गतिमान तसेच सहज सुलभ होण्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यप्रणाली आता ऑनलाईन स्वरुपात करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीचा संबंधित घटकांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध लोककल्याणकारी योजनांच्या ऑनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता रामदास तांबे, संजय खाबडे, संदेश चव्हाण, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर, सुभाष इंगळे, संदिप खोत, मनोज लोणकर, विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, निलेश देशमुख आदी उपस्थित होते.
समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सुसुत्रीकरण करण्यात आले आहे. या सर्व योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. महिला, बालके, मागासवर्गीय, निराधार, कुष्ठपिडीत नागरिक, दिव्यांग, एचआयव्ही बाधित रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गरजू आणि वंचित घटकासाठी ५१ लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या सर्व कल्याणकारी योजना नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर घरबसल्या अर्ज करता येणार आहे. तसेच अर्जाची नेमकी स्थिती काय आहे, हे सुद्धा घरबसल्या समजू शकणार आहे. शिवाय कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीदेखील लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर सर्व अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून नागरिकांना या संकेतस्थळावरून विविध योजनांसाठी अर्ज भरता येणार आहे. महिला व बालकल्याण योजने अंतर्गत १८ योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजणे अंतर्गत ६ योजना, दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत १५ योजना आणि इतर कल्याणकारी योजने अंतर्गत १२ योजना अशा एकूण ५१ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे समाज विकास विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. महिला बचत गटांसाठी त्रिस्तरीय संरचना व त्या माध्यमातून कौशल्यवृद्धी आणि रोजगार निर्मिती याबद्दल विस्तृत माहिती दिली. कौशल्य विकास योजनांमध्ये नाविन्यपूर्ण बदल, विविध योजनांचे सुसुत्रीकरण या बाबींवर तयार केलेल्या नियोजन आणि कार्यवाहीची माहिती यावेळी देण्यात आली. ग्रीन मार्शल पथकामध्ये तृतीयपंथियांचा समावेश, उद्यानांचे परिचालन आणि देखभाल दुरुस्तीचे काम तृतीयपंथीय घटकांना देणे, नवी दिशा उपक्रमांतर्गत सार्वजनिक शौचालये महिला बचतगटांना परिचालन आणि साफसफाईचे काम देणे या बाबी महापालिकेसाठी नाविन्यपूर्ण असल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यावेळी म्हणाले.