आपला समाज, ज्याला आपण सभ्य समाज म्हणतो, तो खूपच खोलवर बिघडला आहे. बदलापूर, आळंदी, कोल्हापूर, दौंड, कोलकत्ता आणि अनेक ठिकाणी घडलेल्या घटनांनी आपल्याला एक प्रकारचा धक्काच दिला आहे. निर्भया कायदा असूनही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे, हे आपल्या समाजाच्या नैतिक मूल्यांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतात. सत्य, निष्ठा, करुणा, सहकार्य, आदर, प्रामाणिकपणा, देशप्रेम यासारख्या मूल्यांचा आपल्याला विसर पडला आहे, असे आता वाटू लागले आहे. नैतिक मूल्ये ही केवळ कागदावरच राहिली आहेत, हे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते. आजच्या स्पर्धात्मक युगात आपण ज्ञान मिळवण्यावर भर देतो, परंतु मूल्य शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आपण इतके स्वार्थी झालेलो आहोत की, आपल्या मुलांना चांगले नागरिक बनवण्याची भावनाच मुळी शिल्लक राहिलेली नाही.
शाळा, ज्याला आपण ज्ञानमंदिर म्हणतो, त्या ठिकाणीच लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडणे, हे अत्यंत वेदनादायी असून समाजातील मूल्य पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. शैक्षणिक संस्था देखील आपल्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोशी असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी आपल्या संस्थची बदनामी होऊ नये यासाठी प्रकरण दाबण्यातच धन्यता मानतात. शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षे पेक्षा आपल्या प्रतिमेची अधिक चिंता वाटणे, ही शिक्षण क्षेत्रातील एक गंभीर बाब आहे. आपल्या विद्यार्थ्यावर एखाद्या विकृत माणसाने केलेल्या अत्याचारापेक्षा आपल्या संस्थेची प्रतिमा मोठी असू शकते का ? याचे भान देखील संस्था चालकांना राहिलेले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शाळा प्रशासनाचे हे कृत्य केवळ एका मुलीच्या आयुष्याशी खेळणे नाही, तर समाजाच्या भविष्याशीही खेळणे आहे. मुलींना सुरक्षित वातावरण न मिळाल्यास, देशाचे भवितव्य कसे उज्ज्वल होईल ?
समाजाने स्त्रीला सदैव पुरुषापेक्षा कमी दर्जाची मानले आहे. महिलांना केवळ शारीरिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यांना वस्तू समजणे ही मानसिकताही लैंगिक अत्याचाराला प्रोत्साहन देते. लहानपणापासूनच मुलांना लैंगिकते बद्दल चुकीचे संस्कार मिळाल्याने ते मोठे होऊण महिलांशी अनादरयुक्त वागणूक करतात. ही लैंगिक असमानताच स्त्रीवरील अत्याचाराचे मूळ कारण आहे. स्त्रियांच्या विरोधात होणारे अत्याचार लपवून ठेवले जातात, समाजात या विषयावर बोलणे टाळले जाते. परिणामी, गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते. तसेच समाजात लैंगिक शोषणाचे विरोध करण्याऐवजी, अनेकदा पीडितेलाच दोषदेण्याची प्रवृत्ती असते अथवा त्याविरुद्ध आवाज उठ्विणाऱ्यांनाच त्रासदिला जातो.
स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही, त्यांचीप्रभावी अंमलबजावणी होत नाही. पोलिसांकडून फिर्यादींच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जात नाही. तपास प्रक्रिया मंदावते आणि पुरावे नष्ट होण्याची शक्यता वाढते. भ्रष्टाचारामुळे गुन्हेगारांना पैशाच्या जोरावर सुटका मिळते आणि पीडित महिलांना न्याय मिळणे कठीण होत चालले आहे. काही लोक आपल्या राजकीय पॉवराचा गैरफायदा करून स्त्रीवरील अत्याचार झाकून टाकण्याचा प्रयत्न करतात. समाजात आपली प्रतिमा व प्रतिष्ठित जपण्याच्या नादात अनेकदा गुन्हे दाखल करताना आडकाठी आणली जाते, गुन्हे दाखल होऊच नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो. पोलीस यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडते व तपासात अडचणी निर्माण केल्या जातात आणि अनेकदा खोटे पंचनामे करून गुन्हेगारांना सुटका मिळवून दिली जाते. प्रभावशाली लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे आता कठीण होत चालले आहे. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळणे अवघड होते व अनेकदा त्यांनाच समाजात बदनामीचा सामना करावा लागतो.
न्यायव्यवस्थेतील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि त्यांच्याकडे असलेले कामकाज यामुळे खटले लांबणीवर पडत आहेत. न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे पीडितेला न्याय मिळण्यात अनेक वर्षे लागतात. न्यायदानाला होणाऱ्या विलंबामुळे पीडितेचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. न्यायव्यवस्थेतील पारदर्शक, निष्पक्षता आणि न्याय मिळविण्यासाठी लागणारा पैसा यामुळे देखील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळत नाही, यामुळे इतरांनाही गुन्हे करण्याचे धाडस होते.
गरीब आणिश्रीमंत यांच्यातील आर्थिक तफावत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गरीबांना मूलभूत गरजा भागवणे कठीण होत असताना, श्रीमंत वर्ग विलासी जीवन जगण्याकडे झुकलेला आहे. यामुळे समाजात दोन वेगळे वर्ग निर्माण होत आहेत आणि त्यांच्यातील संघर्ष वाढत आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जात-धर्म आणि वंश यांच्या आधारे भेदभाव करण्याची प्रथा अजूनही कायम आहे. यामुळे समाजात एकता नाही, तर फूट पसरते. लोकांना त्यांच्या क्षमता आणि गुणांच्या आधारे न्याय मिळत नाही, तर त्यांच्या जात-धर्माच्या आधारे त्यांच्याशी वागणूक केली जाते. समाजात यशस्वी मानले जाणारे लोक नेहमीच नैतिक मूल्यांचे पालन करत असतात असे नाही. पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. यामुळे अनेकदा अनैतिक मार्गानी यश मिळवण्याचे प्रयत्न केले जातात. अनेक लोकांना असे वाटते की त्यांना समाजात समान संधी मिळत नाही. गरीब, दलित आणि विशेषतः महिलांना अनेक क्षेत्रात प्रवेश मिळणे कठीण असते. यामुळे त्यांच्यात निराशा आणि असंतोष निर्माण होतो. असमानता, भेदभाव आणि अन्याय यामुळे समाजात द्वेष, तणाव आणि अनास्था पसरते. लोक एकमेकांवर शंका घेऊ लागतात आणि संघर्ष वाढतो. असमानतेमुळे अनेक लोकांना आपल्याला समान संधी मिळत नाही अशी भावना जोर धरू लागली आहे. यामुळे समाजाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडते आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे.
अशा घटनांनी काही काळापुरतं समाज खडबडून जागा होतो, परंतु काही वेळातच पुन्हा निद्रिस्त होतो. आता समाजातील प्रत्येक व्यक्तीला अशा विषयाबाबत जागरूक होण्याची वेळ आली आहे. आपल्या भावी पिढीला सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची गरज आहे. आपल्या भावी पिढी सुरक्षित असल्यास समाजाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होईल. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात सत्य, निष्ठा, करुणा, सहकार्य, आदर, प्रामाणिकपणा, देशप्रेम यासारख्या मूल्यांचे पालन आपल्या स्वता:च्या जीवनात करून आपल्या भावी पिढीला शिक्षणा सोबत निती-मुल्यांचे शिकवण देखील देणे महत्वाचे आहे. समाज घडवताना आपल्या हातून झालेली चूक दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे.