समाजाने कुटुंबातील सर्व विधी कार्य सत्यशोधक पध्द्तीने करणे काळाची गरज – सत्यशोधक ढोक

0
155

फुले एज्युकेशन तर्फे सांगोला येथे सत्यशोधक पद्धतीने सहावा गृहप्रवेश सोहळा संपन्न.

दि २० मे (पीसीबी ) – फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने खडपेवस्ती,घेरडी सांगोला येथे प्रगतशील शेतकरी व जेष्ठ समाजसेवक शिवाजी आणि पांडुरंग शंकर गोरे यांच्या जय श्री राम बंगल्याची 136 वा महात्मा दिनानिमित सत्यशोधक पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी गृहप्रवेश पुजा 19 मे 2024 रोजी दु.1 वा. महात्मा फुले यांचे वेशभूषेत पार पाडली. यावेळी सत्याचा अखंड ढोक यांच्या मागे सर्वांनी म्हंटले शिवाजी गोरे यांचेकडून सामाजिक प्रार्थना वदवून घेतली..सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास सौ.जयश्री गोरे व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मा.शिवाजी गोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केले तर सौ.वैशाली आणि पांडुरंग गोरे यांचे हस्ते राष्ट्रीय ग्रंथ भारतीय संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय यांचे पूजन केले.

यावेळी ढोक यांनी गृहप्रवेश याची माहिती सांगताना म्हणाले की आपणास सुख समाधान व आर्थिक उन्नती होईल या नावाखाली आजही विज्ञान युग असताना विधीच्या माध्यमातून बहुजनांकडून आर्थिक व वस्तुच्या माध्यमातून भटजी लूट करीत आहे. यामुळे या पुढे समाजाने आपल्या कुटुंबातील सर्व कार्य सत्यशोधक पध्दतीने करावेत असे देखील प्रतिपादन केले. पुढे ते म्हणाले की .छत्रपती शिवाजी महाराज यांनी शुभ दिवस न पहाता कित्येक गड,किल्ले जिंकले ,डागडुजी केली पण कुठे पूजा घातली असे आढळत नाही. पुढे नंतर पेशवाई संपुष्टात आली त्यानंतर पोटापाण्यासाठी पूजा पाट फक्त भटजी करू लागले. यातून बहुजनांची मोठी फसवणूक होऊ लागली. म्हणून 18 व्या शतकात महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ लिहून 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून प्रबोधन व सत्यशोधक कार्य सुरू केले त्याची आजही नितांत गरज आहे असे देखील ढोक यांनी सांगितले.

यावेळी सोमनाथ राऊत म्हणाले की आज पक्के घरे बांधताना, विकत घेताना मुहूर्त, पंचांग, भटजी यांची बिलकुल गरज नसून आपल्या सोयीनुसार कोणत्याही स्त्री पुरुष यांचे कडून सत्यशोधक पद्धतीने महापुरुषांचे प्रतिमा ,पुतळे यांचे पूजन करून गोरे कुटुंबासारखे सुलभतेने मनात कोणताही किंतु न आणता गृहप्रवेश करून ज्या कामगारांनी वास्तू बांधण्यासाठी मदत काम केले त्यांचा सन्मान करा आणि आपल्या जातीतील गरीब मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी असा मौलिक सल्ला दिला.

या प्रसंगी सांगोला परिसरात सोमनाथ राऊत यांचे माध्यमातून गृहप्रवेश सत्यशोधक पूजा प्रथम केली म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे सौ. व श्री.शिवाजी व मा. पांडुरंग गोरे आणि सोमनाथ राऊत यांना सन्मानपत्र व फुले दाम्पत्य फोटो प्रेम भेट मा.रामचंद्र लोखंडे,संजय गाडेकर आणि सत्यशोधक ढोक यांचे शुभहस्ते दिले .तर गोरे कुटुंबाने आलेल्या मान्यवरांना 136 फुले गीत चरित्र आणि सत्यशोधक विवाह विधी ग्रंथ भेट दिले.

पुणे वरून ढोक सर यांनी आपल्या सत्यशोधक लग्नाचा 30 वा.वाढदिवस असतानाही आपल्या कुटुंबाला वेळ न देता आजचे हे कार्य मोफत पार पाडले म्हणून शिवाजी गोरे ,मनीषा गोरे यांनी आभार व्यक्त करीत शाल , श्रीफळ पुष्पहार घालून सन्मान केला. तर या सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक माळी महासंघाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष मा.सोमनाथ राऊत यांनी केले आणि पीएचडी करीत असलेली कन्या सौ.वर्षाराणी नवले हीने व जयराम गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या परिसरात सत्यशोधक पद्धतीने पहिला गृहप्रवेश आणि पुढे 2 मुली ,1 मुलाचे सत्यशोधक पद्धतीने अल्पशिक्षित असताना उच्च शिक्षण देऊनही फुले दाम्पत्याचा वारसा पुढे नेण्यासाठी लग्न लावणार म्हणून जाहीर केल्याने गोरे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.