समाजसेवी पित्याला रक्तदानाने आदरांजली; स्वानंद राज पाठक यांचे पित्यासाठी समाजद्रष्टे ॠणदायित्व

0
282

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य मित्र व रुग्ण मित्र म्हणून लौकिक प्राप्त केलेले सामाजिक कार्यकर्ते स्वानंद राजपाठक यांचे वडील विजयकुमार राजपाठक यांचे दिनांक २० सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. कै. विजयकुमार राजपाठक यांच्या दशक्रिया विधी निमित्त स्वानंद राजपाठक यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपल्या पित्याच्या सामाजिक योगदानाला समाजद्रष्टे ॠणदायित्व पार पाडले आहे.

स्वानंद राजपाठक यांनी पिंपरी चिंचवड शहरात रुग्णसेवेच्या माध्यमातून आदर्श कार्य उभे केले आहेच, परंतु त्यांचे वडील कै. विजयकुमार राजपाठक यांनीही आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत समाजसेवा करण्यात आपले आयुष्य व्यतीत केले आहे. कै. विजयकुमार राजपाठक हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळात नोकरीस होते. तेथे त्यांनी इंटकच्या माध्यमातून वीज मंडळातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक लढे व आंदोलने केली आहेत. निवृत्तीनंतर eps-95 या संघटनेच्या माध्यमातून निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कार्यरत राहिले. कै. विजयकुमार राजपाठक यांचे वयाच्या 78 व्या वर्षी दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले.

आरोग्य मित्र व रुग्ण मित्र असलेल्या स्वानंद राजपाठक यांनी दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपल्या पित्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित केले होते. या शिबिरास आनंद ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या माध्यमातून १आक्टोबर २०२३ रोजी हे रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली श्रद्धांजली अर्पण केली. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक श्री शितल शिंदे यांनी केले.

यावेळी यशवंतराव चव्हाण रक्तपेढीचे डॉ. शंकर मोसलगी, ब्लड बँकेचे कौन्सिलर सुनित आवाटे,डॉ राज शिनकर,आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, रवींद्र कुलकर्णी, माधव जोशी, नरसिंह पाडुळकर सौ. प्रिया जोशी, अशोक नागणे, दिलीप पाटणकर, रवींद्र झेंडे, श्याम ब्रह्मे, प्रदीप वळसनकर, पंकज देशमुख, मयुरेश जोशी, पुनम गुजर, शशिकांत पानट आदी प्रमुख उपस्थित होते.