-कलारंग संस्थेतर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भविष्यातील भारत” या विषयावर व्याख्यान
पिंपरी , दि,४ (पीसीबी) – भारत देश बदलत आहे, पुढे जात आहे. “एक भारत, श्रेष्ठ भारत” ख-या अर्थाने प्रत्यक्षात घडत आहे. गरिबी संपली, समस्या संपल्या असे म्हणणे मुळीच नाही. परंतु, समस्या संपविण्याकडे घेऊन जाण्यासाठीचा रस्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. आपला भारत देश विश्वगुरू बनवायचा आहे. त्यामुळे आपण नामानिराळे राहून चालणार नाही. त्यासाठी समरसतापूर्ण व्यवहार महत्त्वाचा असून जाती-पाती उखडून फेकल्या पाहिजेत. तरच आपण विश्वगुरू होणार आहोत, असा मोलाचा संदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी चिंचवड येथे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला.
कलारंग संस्थेचे २५ वर्षात पदार्पण केले, या निमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित कार्यक्रमात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भविष्यातील भारत” या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी विनोद बन्संल, मुकुंद कुलकर्णी, हेमंत हरहरे, मिलिंद देशपांडे, विनायक थोरात, माहेश्वर मराठे, माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, शंकर जगताप, एकनाथ पवार, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, मोरेश्वर शेंडगे, योगेश बाबर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या लढ्यात अतुलनीय योगदान दिलेल्या क्रांतीकारकांची मुद्देसूद मांडणी करून सुनील देवधर पुढे म्हणाले की, मागील ६५ वर्षात एका परिवाराचा मोठेपाणा दाखविण्यासाठी इतर स्वातंत्र्यसेनानींकडे दुर्लक्ष झाले. विविध जाती, जनजातीमधून शेकडो, हजारो क्रांतीकारक झाले. त्यांना आज पुन्हा समाजापुढे आणले जात आहे. याआधी भटक्या-विमुक्त, जनजातींच्या लोकांवर जन्मापासून गुन्हेगारीचा शिक्का मारला जात होता. तो पुसण्याचे काम सुरू आहे. आम्हाला महिलांचे महत्त्व पश्चमी देशांनी शिकवायची गरज नाही. आमची ओळख भारतामाता म्हणून आहे. नावातही राधा, सितेला पहिले स्थान देतो. महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले, रिअल हिरो आहेत. गेल्या ६५ वर्षात महिलांची उपेक्षा झाली होती. परंतु, मोदींनी त्यांचा विचार केला. गावागावात शौचालये काढले. जनधन खाती, उज्वला सिलेंडर देऊन महिलांचा सन्मान केला. देश बदलत असून पुढे जात आहे.
१९४७ मध्ये आपल्याला फक्त आझादी मिळाली होती. भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारांनी खरे स्वांतत्र्य २०१४ नंतर मिळाले आहे. गुलामी जाणीव करून देणारे ३ हजार कायदे संपवून टाकले. त्यातून प्रत्येकाचे जिवन सुकर होत आहे. काश्मीरमधील लोकांचे अश्रू पुसविण्याचे काम ३७० हटवून केले. पाकिस्तान म्हणजे भारतमातेच्या भूमीवर झालेले अतिक्रमण आहे. तिथल्या लोकांनाही भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. त्यांचा कोणी विचार केला नाही. तो विचार मोदींनी केला.
एक भारत श्रेष्ठ भारत ख-या अर्थाने घडतो आहे. भारताला महाशक्ती करण्याचे हे उदिष्ट आहे. त्यासाठी तुम्ही-आपण नामानिराळे राहून चालणार नाही. जाती-पाती उखडून फेकाव्या लागतील. ते चूक आहे, म्हणून थांबले पाहिजे. ते अजूनही गावात आणि शहरात होत आहे. सावरकारांनी हिंदूचे सैनिकीकरण व राजकीयीकरण झाले पाहिजे, असे म्हटले होते. त्यामुळे हिंदूनी मतदानाला जाताना हिंदू म्हणून विचार केला पाहिजे. तेंडूलकरच्या दहा हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या दहा हजार ओव्यांचे अधिक कौतूक वाटले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
…म्हणून, लोकांनी नरेंद्र मोदींना निवडलं
मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तू विक्रीतून ३०० कोटी मिळाले. ते मुलींच्या शौचालयासाठी दिले. दुसरे मुख्यमंत्री स्वत:साठी सरकारचे ३०० कोटी खर्च करतात. हा फरक पाहून लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून निवडलं. कोट्यवधी लोकांना घरे दिली. विमा योजना, आयुष्यमान भारतसारख्या योजना दिल्या. प्रत्येक गोष्टीतून दलाली काढून टाकण्याचे काम केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निश्चय केला. दलाली बंद करून थेट लोकांपर्यंत, गरिबांपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहचविण्याचे काम ते करत आहे.
कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक अमित गोरखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.