सफाई कामगारांना बारा हजार रुपये बोनस

0
314

– क क्षेत्रीय कार्यालयाचा ठेकेदारांना आदेश ; इतरही क्षेत्रीय कार्यालयाने आदेश देण्याची मागणी

– बाबा कांबळे यांच्या आंदोलनाचे यश

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, असे आदेश क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने संबंधित ठेकेदारांना देण्यात आले आहेत. या मागणीसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आश्वासन देऊनही बोनस न मिळाल्याने संघटनेचे पदाधिकारी शनिवारी (दि. 22) इंद्रायणी नगर परिसरात आंदोलन करत होते. या वेळी अधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिले. कष्टकरी कामगार पंचायतीच्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंद्रायणी नगर येथे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. यावेळी घर कामाला सभा अध्यक्ष आशा कांबळे कष्टकरी कामगार पंचायत सरचिटणीस मधुरा डांगे,उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरात रस्ते, गटारी साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची ठेकेदारांमार्फत नियुक्ती केली आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सफाई कामगार आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. या कामगारांना ठेकेदारांकडून वेळेवर पगार मिळत नाही. दोन-तीन महिने वेतन रखडवले जात आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कामगारांकडे पैसा राहत नाही. परिणामी घर खर्च करायचा कसा असा सवाल होता. हे प्रश्न घेऊन कष्टकरी कामगार पंचायत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार रस्त्यावर उतरत आहे.

सध्या दिवाळीचा सण आहे. या दिवशी कामगारांना पगार तर वेळेवर मिळणे गरजेचे आहे. यासह दिवाळी बोनस देखील मिळणे गरजेचे आहे. मात्र कामगारांना बोनस तर दूरच, हक्काचा पगार देखील मिळत नव्हता. हा पगार न मिळाल्यास महापालिकेसमोर दिवाळी साजरी करत प्रशासनाचा निषेध करण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला होता. यासाठी आंदोलन देखील करण्यात आले. या आंदोलनाची दखल क क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने घेण्यात आली. कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी संबंधित ठेकेदाराला बोनसची रक्कम अदा करावी, अशा सूचना लेखी दिलेले आहेत. क क्षेत्रिय कार्यालयाप्रमाणे इतरही क्षेत्रीय कार्यालयाकडून ही अंमलबजावणी व्हावी अशी संघटनेची मागणी असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. अन्यथा इतर क्षेत्रीय कार्यालयासह महापालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.