सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’; 9 भाषांत ऑनलाईन महोत्सव !

0
328

– धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’त सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) : हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. त्या त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे, यावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे हा होय. हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा 13 जुलै 2022 या दिवशी मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात 154 ठिकाणी प्रत्यक्ष, तर 9 भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड,तळेगाव दाभाडे आणि जुन्नर परिसरात 3 ठिकाणी सायं 5.30 वा गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

1 ) थोपटे लॉन्स, थोपटे वस्ती,रहाटणी,पुणे 17
2 ) अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय,तपोधाम कॉलनी,वराळे रोड,तळेगाव दाभाडे,पुणे
3 ) राजा शिवछत्रपती सभागृह,ब्रह्मन् बुधवार पेठ (टिळक रोड )मु.पो. जुन्नर,पुणे

तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यांसाठी या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.तसेच ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण असणार आहे. विविध विषयांवरील अध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

यांसह 9 भाषांतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ सनातन संस्थेच्या youtube.com/SSMarathi ‘यू-ट्यूब चॅनल्स’वरून प्रसारित करण्यात येणार आहेत. गुरुपरंपरेचे महत्त्व समाजमनावर बिंबावे, समाज साधनेला प्रवृत्त व्हावा, तसेच धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती व्हावी, यांसाठी या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.