सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!

0
121
  • भगवे ध्वज, टाळ-मृदुंग घेतलेले वारकरी, रणरागिणींची स्वसंरक्षण प्रात्याक्षिके, पारंपारिक वेशभूषा, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी दिंडीचे आकर्षण !

पुणे – सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ रविवारी सायंकाळी पुणे येथे ९ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली. यात २० हून अधिक विविध संप्रदाय-संघटना सहभागी झाल्या होत्या. पुणे शहरात ठिकठिकाणी रांगोळी काढून अन् दिंडीवर पुष्‍पवृष्‍टी करून मान्यवरांच्या हस्ते दिंडीचा सन्मान करण्यात आला.

प्रारंभी पुणे येथील ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरा’चे विश्वस्त श्री. राजेंद्र बलकवडे आणि ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’चे उपाध्यक्ष श्री. सुनील रासने यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून भिकारदास मारुति मंदिरापासून (महाराणा प्रताप उद्यानापासून) ‘सनातन गौरव दिंडी’ला भक्तीमय वातावरणात आणि देवतांच्या जयघोष करून प्रारंभ झाला.

या दिंडीमध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, पूज्य गजानन बळवंत साठे, पूज्य (सौ.) संगिता पाटील आणि पूज्य (सौ.) मनीषा पाठक आदी संतांची वंदनीय उपस्‍थिती लाभली. तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, ‘महाराष्ट्र गोसेवा’ अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, ‘श्री संप्रदाय’च्या महिला अध्यक्ष सौ. सुरेखा गायकवाड, श्री. गायकवाड, ‘पतित पावन संघटना’ पुणेचे अध्यक्ष श्री. स्वप्नील नाईक आणि ‘ग्राहक पेठे’चे कार्यकारी संचालक श्री. सुर्यकांत पाठक, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.

या दिंडीविषयी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की, सनातन संस्था गेल्या २५ वर्षांपासून निस्वार्थपणे सनातन हिंदु धर्माची सेवा करत आहे. सनातन धर्मावर आलेल्या संकटांच्या विरोधात उभे ठाकणे, सनातन धर्मावरील आरोपांचे खंडण करणे, हिंदूंना धर्माचे शिक्षण देऊन धर्माचरण करण्यास उद्युक्त करणे, सर्वांना एकत्र करून धार्मिक एकतेसाठी आणि धर्मरक्षणासाठी सनातन संस्थेने सातत्याने काम केले आहे. आज कोणीही उठतो आणि सनातन धर्माला डेंग्यू-मलेरियाची उपमा देऊन सनातन धर्माच्या निर्मूलनाची भाषा करतो, यासाठी विविध परिषदा भरवल्या जात आहेत. त्याला हिंदूंनी संघटित होऊन योग्य उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हजारो हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली आहे.’

देवता आणि संत यांच्या पालख्यांसह ७० हून अधिक पथके सहभागी !

श्रीरामनामाचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी माता, श्रीविठ्ठल-रुक्मिणीमाता, श्री भवानीमाता, श्रीखंडोबा-म्हाळसादेवी, संत सोपानदेव, छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमा असलेल्या अन् फुलांनी सुशोभित केलेल्या पालख्या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या पारंपरिक वेशातील साधक, कार्यकर्ते, तुळशी घेतलेल्या महिला, छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांचे मावळे, बाजीप्रभू देशपांडे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईं यांच्या वेशातील बालके, तसेच ‘रणरागिणी’द्वारे दाखवण्यात आलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे दिंडीचे मुख्य आकर्षण होते ! या दिंडीत ७० हून अधिक पथके,२० हून अधिक आध्यात्मिक संस्था, संघटना, संप्रदाय, मंडळे, मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. दिंडीच्या मार्गात १२ हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमी, समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठीत यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले, धर्मध्वज पूजन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील सौ. विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या मैदानात दिंडीची सांगता झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शेवटी सनातन संस्थेचे पुणे येथील श्री. चैतन्य तागडे यांनी दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.