सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिलला ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन !

0
213
  • ५० हून अधिक धार्मिक संस्था आणि संप्रदाय यांची पथके सहभागी होणार !

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे २१ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता महाराणा प्रताप उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक डेक्कन अशी भव्य ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. या गौरव दिंडीमध्ये ५० हून अधिक धार्मिक संस्था आणि संप्रदाय यांची पथके सहभागी होणार आहेत. समस्त हिंदूंनी जात, पक्ष, संप्रदाय विसरून एक सनातन धर्मप्रेमी हिंदू म्हणून या सनातन गौरव दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांनी स्वतःचे बॅनर, पथक, पथसंचलन या माध्यमांतून उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

     पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, अधिवक्ता मंगेश जेजुरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

   सनातन गौरव दिंडी पायी निघणार असून दिंडीचा आरंभ महाराणा प्रताप उद्यान (भिकारदास मारुति मंदिर चौक, बाजीराव रस्ता) येथून होऊन बाजीराव रस्ता मार्गे लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, डेक्कन येथे सांगता होईल. 'सनातन गौरव दिंडी'त भगवे ध्वज, पारंपारिक पोशाख, विविध पथके, विविध देवतांच्या पालख्या अशा प्रकारे दिंडीचे स्वरूप असेल. असेही आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

    या वेळी‘सनातन गौरव दिंडी’ काढण्याचा उद्देश स्पष्ट करतांना श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘वर्ष १९९९ मध्ये सनातन संस्थेची स्थापना झाली असून तेव्हापासून संस्थेचे अखंडपणे सनातन धर्माच्या प्रचाराचे कार्य आणि हिंदू एकतेचे कार्य चालू आहे. सनातन ही समाजाची आध्यात्मिक सेवा करणारी, श्रद्धासंवर्धन चळवळीतील एक अग्रणी संस्था आहे. संस्थेच्या वतीने समाजातील विविध वर्गांसाठी मानसिक तणाव नियंत्रण कार्यशाळा, शाळांमध्ये आध्यात्मिक प्रश्नमंजुषा, नैतिक मूल्यांविषयी व्याख्याने, समाजासाठी व्यसनमुक्तीसाठी प्रवचन, विनामूल्य आरोग्य शिबिर, मंदिर स्वच्छता आदी सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात. हे सर्व कार्य दिवसेंदिवस वाढतच असून लोकांचा सहभाग वाढत आहे. तसेच सनातन संस्थेने देशभर विश्वकल्याणकारी हिंदु राष्ट्राची मोठी जागृती केली आहे.