दि.१३ (पीसीबी) – इंग्लंडमधील लोकप्रिय टी-२० स्पर्धा ‘द हंड्रेड 2026’ च्या लिलावात एक निर्णय सध्या मोठ्या वादाचे कारण ठरला आहे. सनरायजर्स लीड्स या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला संघात घेतल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
या संघाची मालकी काव्या मारन यांच्याकडे असून त्या आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाशीही संबंधित आहेत. आयपीएलशी संबंधित फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावू नये, अशी चर्चा आधीपासून सुरू होती. मात्र सनरायजर्स लीड्सने अबरार अहमदला संघात घेतल्याने हा वाद अधिकच पेटला आहे.
सोशल मीडियावर काही चाहत्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सनरायझर्स हैदराबाद संघालाही आयपीएलमधून बाहेर काढावे, अशी मागणीही काही ठिकाणी करण्यात येत आहे.
दरम्यान या वादावर सनरायजर्स लीड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. व्हेटोरी यांनी सांगितले की,
अबरार अहमद हा अत्यंत वेगळ्या शैलीचा आणि विविधता असलेला फिरकी गोलंदाज आहे. इंग्लंडमधील अनेक स्थानिक फलंदाजांनी त्याचा पूर्वी सामना केलेला नाही. त्यामुळे संघाच्या रणनीतीनुसार त्याला संघात घेण्याचा निर्णय घेतला गेला.
लिलावात उपलब्ध असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय फिरकीपटूंमध्ये अबरार अहमद हा आमचा पहिला पर्याय होता, असेही व्हेटोरी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ‘द हंड्रेड’च्या लिलाव यादीमध्ये एकूण १३ पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता, मात्र त्यापैकी फक्त दोन खेळाडूंवरच बोली लागली. अबरार अहमद व्यतिरिक्त उस्मान तारिक या मिस्ट्री स्पिनरलाही बर्मिंगहॅम फिनिक्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे.
२७ वर्षीय अबरार अहमद याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत ५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ६.६७ इतका आहे. तर एकूण टी-२० कारकिर्दीत त्याने ८४ सामन्यांत १०९ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान या निवडीमुळे क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून पुढील काही दिवसांत या वादाला आणखी रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















































