सध्या राज्यपाल पदाचा गैरवापर होत आहे

0
480

 मुंबई, दि.२९ (पीसीबी) – शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी समोरीच चिंता वाढल्या आहेत. अशातच राज्यपालांची भुमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले आहे.

उल्हास बापट म्हणाले की, राज्यपाल हे केंद्राचे नोकर नसतात पण ते एका राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांना काम करावे लागते हे घटनेत स्पष्ट आहे. फक्त काही निर्णयच ते घेऊ शकतात. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणुन वाईट वाटते की, सध्या राज्यपाल पदाचा गैरवापर होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसारच वागावे लागते. सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना बोलूनच बोलवावे लागते. उद्या बोलावलेलं अधिवेशन घटनाबाह्य आहे, असे मत त्यांनी मांडले.

सर्वोच्च न्यायालयात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचे आहे. शिवसेना अजुन देखील उध्दव ठाकरे यांनीच आहे. राज्यपालांची भूमिका संशयाच्या विळख्यात येणारं असेल तर दुर्दैव आहे. अशा घटनांतून राजकारणाचा विजय होत आहे तर घटनेची पायमल्ली होत आहे. राज्यपालांनी अनेकवेळा घटनेचे उल्लंघन केले आहे. उदाहरणच द्याचे झाले तर 12 आमदारांची निवड आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहटेचा शपथविधी ही उदाहरणे समर्पक ठरतील, असे त्यांनी सांगितले.