सदा सरवणकरांची उमेदवारी कायम, अमित ठाकरे अडचणीत

0
76

मुंबई, दि. ४ (पीसीबी) –
निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघात सोमवारी रंजक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सदा सरवणकर हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. मात्र, त्याठिकाणी पोहोचल्यानंतर सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या घरात गेले नाहीत. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि काही पदाधिकारी शिवतीर्थ निवासस्थानी आतमध्ये गेले. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे जाऊन सदा सरवणकर यांना आपल्याला भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र, राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना भेटण्यास नकार दिला.

यानंतर सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, राजसाहेबांना भेटायला माझा मुलगा आणि काही पदाधिकारी गेले होते. त्यांनी सांगितले की, पप्पा बाजूला आहेत, तुम्हाला भेटू इच्छितात, निवडणुकीबाबत बोलू इच्छितात. पण राज ठाकरे म्हणाले, मला काही बोलायचं नाही. तुम्हाला निवडणूक लढवायची तर लढवा, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा तर मागे घ्या. मला यावर कोणतीही चर्चा करायची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

त्यामुळे राज ठाकरे आणि माझ्यात कुठलंही बोलणं झालं नाही. राज ठाकरे यांनी भेटसुद्धा नाकारली. त्यामुळे आता एक कार्यकर्ता म्हणून मला माहीममधून निवडणूक लढवावी लागेल. भेटच मिळणार नसेल तर मला माझा निर्णय घ्यावा लागेल. मी महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे. वैयक्तिक मैत्रीपोटी भाजपचे काही नेते अमित ठाकरे यांना पाठिंबा देत असतील. पण महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.

मी राज ठाकरेंचा आदेश ऐकणार होतो: सदा सरवणकर
सदा सरवणकर यांनी म्हटले की, आम्ही मदतीसाठी एक नव्हे तर दोन्ही हात पुढे केले होते. राज ठाकरे यांनी दिलेला आदेश आम्ही ऐकणार होतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागायचे ठरवले होते. पण त्यांनी भेटच नाकारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला राज ठाकरे यांची भेट घ्यायला सांगितली होती, असे सदा सरवणकर यांनी म्हटले. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने माहीम विधानसभा मतदारसंघात आता अमित ठाकरे Vs सदा सरवणकर Vs महेश सावंत अशी तिहेरी लढाई निश्चित झाली आहे.