मुंबई, 19 जून (पीसीबी) :- हॉटेलमध्ये जेवणाची उधारी थकल्यामुळे एका हॉटेलमालकाने माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी तो राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या असल्याचा आरोप केला आणि आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत हे पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ‘हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा’ असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांना अडवले होते. या प्रकारामुळे सदाभाऊ खोत चांगलेच अस्वस्थ झाले होते.
त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत, ‘पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यासाठी सांगोल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे,अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली होती. तसंच सदाभाऊ यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.