पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालय, कासारवाडी या शाळेच्या १९८६ – ८७ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन आणि शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमाचे रूपांतर नकळत इयत्ता दहावीच्या वर्गात झाले आणि तत्कालीन शिक्षकांसह सर्व माजी विद्यार्थी तब्बल सदतीस वर्षांनंतर भूतकाळातील रम्य आठवणींमध्ये रममाण झाले. ॲड. कारभारी टिळेकर अध्यक्षस्थानी होते; तसेच नवनाथ बोऱ्हाडे, दिलीप तापकीर, सुभाष प्रामाणिक, संपतराव कोहोकडे, रेश्मा नायकवडी, नलिनी डंबे, एम. व्ही. कुलकर्णी, या तत्कालीन शिक्षकांसह माजी नगरसेवक शाम लांडे, ‘माझी आवडती शाळा’ समूहाचे अध्यक्ष वसंत टिळेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
नंदकुमार कांबळे यांनी प्रास्ताविकातून, “इयत्ता दहावीतील सर्व माजी वर्गमित्रांनी एकत्र येऊन मनोरंजनासोबत विधायक उपक्रम राबविण्यासाठी ‘माझी आवडती शाळा’ या समूहाची निर्मिती करण्यात आली आहे!” अशी माहिती दिली. रवींद्र लांडगे, चिमण लांडगे, गणेश पठारे, प्रकाश कानडे, महेश नगरे, रवींद्र चेडे, अविनाश जासूद, त्रिंबक भाकरे, सुनील शेटे, सुनंदा लांडगे, वैशाली गुळवणी, मालती धुमाळ, संगीता गोरडे, रोहिणी वाघमारे, रेखा चव्हाण, शाईन खान,सुनीता गायकवाड या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावपूर्ण मनोगतांमधून शालेय आठवणींना उजाळा दिला; तसेच लॉटरीच्या खेळातून आपल्या वाट्याला आलेल्या चिठ्ठीच्या माध्यमातून आवडते शिक्षक, भीतिदायक शिक्षक, मधल्या सुट्टीतील मजा, वर्गाच्या खिडकीतून पलायन, ‘बे’चा पाढा, वर्गातील आठवण, शाळेवरील गाणे, अविस्मरणीय आठवण अशा विषयांवर उत्स्फूर्त सादरीकरण करीत धमाल उडवून दिली.
वर्गावरील तास घेत असल्याप्रमाणे माजी शिक्षक नवनाथ बोऱ्हाडे यांनी, “शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो!” , दिलीप तापकीर यांनी, “जीवन हे धकाधकीचे आहे त्यामुळे आपले छंद आणि आवडी जोपासा!” , सुभाष प्रामाणिक यांनी, “आमच्या जीवनातील शिशिर ऋतू सुरू झाला असून कधीही आमचे पान गळून पडेल!” , एम. व्ही. कुलकर्णी यांनी, “वर्गशिक्षिका म्हणजे आईच अशी विद्यार्थ्यांची भावना असते!” , रेश्मा नायकवडी यांनी, “शिक्षिका म्हणून कासारवाडी शाळेने जीवनात आनंदाचे क्षण दिलेत!” , नलिनी डंबे यांनी, “आम्ही शिकवताना जे पेरले ते उगवले याचा अत्यानंद आहे!” , संपतराव कोहोकडे यांनी, “समाजऋणाची जाणीव ठेवा!” असे बोधामृत विद्यार्थ्यांना पाजले. माजी विद्यार्थी शाम लांडे यांनी, “शालेय जीवन अतिशय आनंददायी अन् खोडकर होते. शिक्षकांचा मार खाऊन आम्ही घडलो!” अशी भावना व्यक्त केली. ॲड. कारभारी टिळेकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “शिक्षक श्रेष्ठ असतातच; पण हे जग आपल्याला दाखविणारे आईवडील सर्वश्रेष्ठ आहेत. जीवनात अंतर्मनाचा कौल घेऊन नेहमी सदाचाराने वागले तर निश्चितच यश मिळते!” असा उपदेश केला. घमाजी लांडगे, राजू खळदकर, सोमनाथ शिंदे, अनिल बांगर, प्रशांत पोलकम, संदीप राजे शिर्के, दीपक परदेशी, राजेंद्र शिवशरण, रमेश देवरुखकर, दिनेश जोशी यांनी संयोजनात सहभाग घेतला. शशिकांत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. वसंत टिळेकर यांनी आभार मानले.











































