भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्याकडून सर्व आंदोलनकर्त्यांचा सन्मान सोहळा
पिंपरी, १ नोव्हेंबर २०२५ – पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाखालील कत्तलखाना बंद व्हावा, तसेच महापालिकेने कत्तलखान्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध करून देऊ नये, या मागणीसाठी २०११-१२ मध्ये स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी उभारलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर न्याय मिळाला. पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सु.भा.शेलार यांनी आज सर्व ११ आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
२०११ – १२ मध्ये पिंपरीत कत्तलखान्याच्या प्रस्तावाने परिसरातील पर्यावरण, आरोग्य आणि धार्मिक भावनांना धक्का बसणार असल्याचे कारण देत हजारो नागरिक, व्यावसायिक व हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरले होते. शांततापूर्ण आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी जमावबंदी, दंगल भडकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर आरोप लावत चंद्रशेखर अहिरराव, महेश मोटवानी, राकेश आछरा, अशोक रांका, तुषार रांका, कपिल रांका, रश्मी रांका, शिल्पा रांका, कविता सोनिगरा, गायत्री चितळे आणि हिरल चितळे या ११ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. यामुळे हे ११ जण १४ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. यामुळे आंदोलकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. परंतु पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. शेलार यांनी पुरावे तपासून सर्व आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.
या पार्श्वभूमीवर पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने सर्व आंदोलनकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना वाघेरे म्हणाले की, “हा सत्याचा विजय आहे. आंदोलनकर्त्यांनी आपली हिंदू संस्कृती व पर्यावरण रक्षण करण्यासाठी लढा दिला होता. सर्व आंदोलक खऱ्या धैर्यवान योद्धे आहेत. त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे वाघेरे म्हणाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा आचरा, नरेश पंजाबी, राकेश मोरे, लक्षू बुलाणी, विजय चितळे विजय चितळे गणेश वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.















































