सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने डॉ.बाबा आढाव सन्मानित

0
3

दि.३० – पाऊस सुरू असताना देखील जेधे मेन्शन येथे महापुरुषांच्या तसेच आप्पासाहेब व केशवराव जेधे यांच्या प्रतिमांना वंदन करून भर पावसात सत्यशोधक हेरिटेज वॉक ( आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारक, गुरुवर्य बाबुराव जगताप स्मारक मार्गे ) महापुरुशांचे जयघोषाने परिसर धुम्धुम्ला होता. प्रसंगी रघुनाथ ढोक महात्मा फुले यांच्या व तसेच राखी रासकर या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत होत्या. माजी सनदी अधिकारी महेश झगडे व माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या हस्ते सत्यशोधक समाजाच्या झेंड्याचे ध्वजारोहण छत्रपती शाहू महाराज नगरीत (शिवाजी मराठा सोसायटी आवार) करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत खासे पवार सभागृहात शिवरायांची राजमुद्रा, सार्वजनिक सत्यधर्म व भारतीय संविधानाच्या एकत्रित प्रतिमेचं उद्घाटन करून उद्घाटन सत्राला प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला मा. जगदीशराव जेधे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच प्रतिनिधींचे पत्रकारांचे स्वागताध्यक्ष नात्याने स्वागत केले. त्यांतर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांना महेश झगडे ( माजी सनदी अधिकारी ), माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, माजी महापौर कमलताई व्यवहारे, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे व सत्यशोधक समाज संघाचे अरविंद खैरनार या सर्वांच्या हस्ते महात्मा फुलेंच शेला पागोटं व कार्यासाठी रुपये ३०, ००० धनादेश देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी बाबा आढाव यांनी श्री शिवाजी मराठा सोसायटीत त्यांचे झालेले शिक्षण त्यांच्यावर झालेला सत्यशोधक विचारांचा संस्कार, वर्तमान परिस्थितीत सत्यशोधक विचारांची आवश्यकता व त्यांच्या सार्वजनिक जीवनातील आठवणी सांगितल्या.

उद्घाटकीय भाषणात महेश झगडे यांनी एकंदरीत प्राचीन भारताच्या इतिहासापासून वर्तमान भारताच्या इतिहासाची मांडणी केली व वर्तमान परिस्थितीत शेतकरी कष्टकरी जनतेचे होणारे शोषण यावर सुद्धा प्रकाश टाकला. व शोषणमुक्त राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका मांडली.

माजी महापौर कमल व्यवहारे यांनी त्यांच्या कार्यकाळातील दादू कोंडदेव पुतळा हटविण्यासाठी कशाप्रकारे भूमिका घेतली ते सांगितले बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी महिला म्हणून महापौर होऊ शकली हे सुद्धा आवर्जून सांगितले.

त्यानंतर अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना राजकुमार धुरगुडे यांनी इतिहासाचे झालेले विकृतीकरण तसेच शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांची वर्तमान व्यवस्थेने केलेली हेळसांड तसेच जाती-जातीत लावली गेलेली भांडणे यावर आवर्जून प्रकाश टाकला तसेच भविष्यात सुद्धा या समितीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण जनजागृती तसेच समाज उत्थानाचे कार्य पार पाडण्या संदर्भात मांडणी केली. या सत्राचे औपचारिक रित्या उद्घाटन बुवासाहेब हुंबरे यांनी केले.

महात्मा जोतीराव फुले यांची सत्यशोधक समाज स्थापना करण्यामागील भूमिका व वर्तमानात या विचारांची प्रासंगिकता या विषयाला हात घालताना कॉम्रेड किशोर ढमाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शृंखला गुंफली. व महात्मा फुले यांनी सामाजिक उत्थानाचे केलेलं भरीव कार्य जसे की महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे यांचे कार्यकर्तृत्व सांगितले. तसेच महात्मा फुले यांच्या नेतृत्वात झालेल्या जुन्नर ओतूरची शेतकऱ्यांच्या चळवळी संदर्भात सुद्धा मांडणी केली. महात्मा फुलेंचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा जात पात धर्म लिंग विरहित राष्ट्र निर्माण करणारा होता म्हणूनच इंग्रज भारत छोडो या आंदोलनात सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते अग्रणी होते हे सुद्धा आवर्जून सांगितले. यात त्यांनी खानदेशातील काही गावांचा नामोल्लेख केला.

अरविंद खैरनार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक महात्मा जोतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाजाची भूमिका या दोन्ही विषयावर सत्यशोधक समाज संघ विचार व्यक्त केलेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शाक्त अर्थात कुळदेवीचे उपासक होते. त्यांना वैदिक राज्याभिषेक मान्य नव्हता कारण त्यामुळे स्वराज्याचा खजिना हा पहिल्या राज्याभिषेकात धर्मा मार्तंडांनी लुटला परंतु प्रश्न राज्य मान्यतेचा असल्यामुळे त्यांना हा राज्याभिषेक नाईलाजास्तव करून घ्यावा लागला या राज्याभिषेकानंतर लगेच तीन महिन्यांनी त्यांनी शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला. शाक्त परंपरा म्हणजे जातीभेदाला न मानणारी प्रथा होय तसेच प्रथम मान आईला, पत्नीला व तमाम स्त्रियांना देणारी होय अर्थातच मातृसत्ताक व्यवस्थेचा सन्मान करणारी होय. शिवरायांनी, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचा माईंड कल्टीवेट करण्याचा ठेका निरपेक्ष भूमिकेतुन घेतला अगदी याच धर्तीवर आपल्याला सुद्धा वर्तमानत समाजाचे मन परिवर्तित करण्याचे कार्य करावे लागेल यावर आवर्जून प्रकाश टाकला. सत्यशोधक विचाराला बळकटी आणण्यासाठी महाराष्ट्रात किमान 8 ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासंदर्भात भूमिका मांडली व या कार्यासाठी सर्व जनतेने असे आवाहन केले.

प्रवीण दादा गायकवाड ( प्रदेशाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड) यांनी संविधान संस्कृती व बहुजन क्रांती या विषयावर विचार व्यक्त करीत असताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून ओळखणारी मनुसतीचे जाहीर दहन महाड येथे केले व माणसाला माणूस पण देणाऱ्या संविधानाची निर्मिती केली. गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा समाजातील तरुणांना शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला बऱ्यापैकी यश आलेले आहे परंतु वर्तमान व्यवस्था बहुजन समाजाच्या तरुणां मध्ये जाती जातीची भांडण लावण्याचे काम करीत आहे यासाठी आम्हा सर्वांना सत्यशोधक विचार मजबुतीने प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे लागतील. त्याशिवाय प्रशिक्षित कार्यकर्ता निर्माण होणार नाही. प्रशिक्षित कार्यकर्ता निर्माण झाल्याशिवाय सत्यशोधकी विचार कल्टीवेट होणार नाही. यावेळी त्यांनी ही शिवाजी मराठा सोसायटी या संस्थेची निर्मिती सत्यशोधक शाहू महाराज व सत्यशोधक चळवळीचे जेधे बंधू, गुरुवर्य जगताप आधी सर्वांनी केली अर्थातच या संस्थेला सत्यशोधकांचा वारसा आहे या सर्व संस्था जतन करणे आपली जबाबदारी आहे. संविधान समजून सांगणे ही आपली प्राथमिक आवश्यकता आहे हे झाल्याशिवाय बहुजन क्रांती होऊ शकत नाही असे त्यांनी सरते शेवटी मांडले.

ही परिषद यशस्वी करण्यासाठी जगदीश जेधे, प्रा. दत्ताजीराव जाधव, अमृतराव काळोखे, रघुनाथ ढोक, मुकुंद काकडे, प्रतिमा परदेशी, दत्तात्रय जाधव, मोहिनी कारंडे, उद्धव कोळपे, जितेंद्र चौधरी, शिवाजी पाटील, रमेश माने,जमाते इस्लाम हिंदचे व आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यावेळी तुफान चक्रीवादळाच्या पावसाची तमा न बाळगता सत्यशोधकांची उल्लेखनीय उपस्थिती होती .