सत्तेत असो किंवा नसो, त्यांना विदर्भात येताना नेहमीच उशीर होतो

0
285

मुंबई,दि.२७ (पीसीबी) –  गेल्या आठवड्यात पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आले आणि जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवार या दौऱ्यात पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागांची पाहाणी करणार आहेत.

अजित पवारांच्या या विदर्भ दौऱ्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. नेहमीप्रमाणे अजित पवारांनी फार उशीर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ विदर्भ दौरा केला. तातडीने शेतकऱ्यांंच्या नुकसानीची पाहणी केली आणि ताबडतोब मदत जाहीर केली. जर पश्चिम महाराष्ट्रात इतका हाहाकार माजला असता, तर अजित पवार तातडीने गेले असते. सत्तेत असो किंवा नसो, त्यांना विदर्भात येताना नेहमीच उशीर होतो, असा आरोप बोंडे यांनी केला.

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्याने मंत्रीमंडळाची स्थापना आणि खातेवाटप झाले नाही. जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने प्रशासनाला आणि शासनाला काम करताना मर्यादा येत आहे. त्यामुळे अजित पवार या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी पवारांवर टीका करताना बोंडेंनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर आणि त्यांनी बंडखोरांवर केलेल्या आरोपांवर भाष्य केले.

उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पालापाचोळा म्हटले होते. त्यावर बोंडे म्हणाले, आपल्याच पक्षातून गेलेल्या लोकांना बोलताना त्यांनाही दु:ख होत असेल. सर्व शेतच जर पाखरांनी खाल्ले असेल, तर शेतकऱ्याने कितीही कपाळावर हात मारला आणि पालापाचोळा म्हंटले तरी त्याचा आता काही उपयोग नाही.