सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी…

0
150

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. राज हे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. शाह-ठाकरे भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज ठाकरेंना चिमटा काढला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. अशातच भाजप नेत्यांसोबत त्यांची जवळीक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महायुतीत सहभागी होत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) टि्वट करीत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्टच झाली आहे. याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी…असे टि्वट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली. शरद पवारांनी शिवाजी महाराजांचे नाव कधीही घेतले नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून निधी जमा करण्यात आला. 1999पासून हे विष राज्यात कालवले गेले, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते.

दक्षिण मुंबईतील जागा मनसेला सोडावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबत नाशिक किंवा शिर्डी या दोन मतदारसंघांपैकी एक भाजप मनसेला सोडण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून राज ठाकरेंचे निष्ठावान मनसैनिक आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची नुकतीच मुंबईत जाहीर सभा झाली. भाजपने सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, मोदी सरकारमुळे देश कसा चौफेर प्रगती करत असल्याचे दाखविले आहे. ही जाहिरात हिंदी असल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपवर टीका केली आहे. भाजपने प्रचार यंत्रणेचा नारळ फोडला असला तरी, हा नारळच नेमका नासका निघाला, असे ट्विट शरद पवार पक्षानं केले आहे.