पुणे, दि. ०१ (पीसीबी) – महाराष्ट्रात सत्ता बदलताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यात आला आहे. शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी होऊन काय कारवाई होणार याची मोठी उत्सुकता आहे.आयकर विभागाने 2004 ते 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल ही नोटीस आली आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्र असून उत्तर देणार असल्याचं शदर पवार यांनी म्हटले आहे. तसेच विरोधी विचारांच्या लोकांवर ईडीचा गैरवापर केला जात असल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांना आयकर विभागाने गुरुवारी 30 जून रोजी नोटीस बजावली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले त्याच दिवशी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसांवर ताशेरे ओढत पवार यांनी या नोटीसीला ‘लव्ह लेटर’ म्हटले आहे.ईडी आणि केंद्रीय यंत्रणांची मदत हल्ली घेतली जाते त्याचे परिणाम दिसतात. अनेक विधानसभेचे सदस्य चौकशीच्या नोटीसा आल्याचे सांगतात. ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. पाच वर्षापूर्वी ईडी हे नाव देखील आम्हाला माहीत नव्हते. आज तर गावखेड्यात देखील लोक गमतीने तुझ्या मागे ईडी लागेल असं म्हणतात, असा खोचक टोला पवार यांनी लगावला आहे.2009 साली देखील मी लोकसभेला उभा होतो, 2009 नंतर 2014 च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो, तसेच 2020 च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आहे. सुदैवाने त्याची सर्व माहिती माझ्याकडे व्यवस्थित ठेवलेली आहे, अशी माहिती पवार यांनी ट्विट करत दिली आहे.