दि.२२(पीसीबी)-प्रचारादरम्यान एकमेकांविरूद्ध विखारी टीका करणारे उमेदवार सत्तेसाठी नंतर गळाभेट घेताना दिसतात. असाच काहीसा प्रकार अचलपूर नगरपालिकेत घडला आहे.अचलपूर नगरपालिकेच्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीच्या वेळी भाजपने वेगळीच रणनीती आखली. विविध विषय समित्यांचे सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पद्धतीने व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यात भाजपला यशही आले. या मतैक्याचा फायदा एमआयएमलाही झाला आणि एक सभापतीपद या पक्षाच्या वाट्याला आले. यात सत्तासमीकरण महत्वाचे ठरले.
गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत अचलपूरचे नगराध्यक्षपद पहिल्यांदाच भाजपकडे आले. मात्र ४१ पैकी १५ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याचवेळी १० अपक्ष निवडून आले. भाजपला ९ जागा मिळाल्या. तीन जागांवर एमआयएमचे तर राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.
विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या खुर्शीदा बानो अताउल्ला शाह यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर बांधकाम समितीची जबाबदारी महाआघाडीच्या दीपाली महेंद्र जवंजाळ यांच्याकडे सोपविण्यात आली.
शिक्षण समितीच्या सभापतीपदी एमआयएमच्या रुखसाना बी. मोहम्मद ईसा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नियोजन समितीच्या सभापतीपदी अपक्ष दर्शना मोहनसिंह ठाकूर यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या दुर्गा विवेक सोनापुरे यांची निवड करण्यात आली आहे.
यासोबतच स्थायी समिती सदस्यांचीही निवड करण्यात आली. यामध्ये भाजपचे सुरेंद्रकुमार रतनलाल तांबे, अपक्ष सुशीला देविदास इंगळे, काँग्रेसचे मोहम्मद असलम मोहम्मद अहमद वंजारा यांचा समावेश आहे.
एमआयएमशी युती नाही- अभय माथने
भाजपने एमआयएमशी युती केल्याची चर्चा चुकीची आहे. कारण, अचलपूर नगरपालिकेत एमआयएमचा गटच अस्तित्वात नाही. अचलपूर मध्ये काँग्रेसचे १५, भाजपचे अपक्ष मिळून १०, अचलपूर विकास आघाडीचे ८ आणि अपक्ष ८ असे मिळून ४१ जणांचे गटनिहाय बलाबल आहे. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आम्ही एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही. या ठिकाणी एमआयएमचा गटच नसल्याने युतीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भाजपचे अचलपूर येथील नेते अभय माथने यांनी सांगितले.






































