- महेश झगडे
महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव नसून, तो आता राजकीय सर्कस बनला आहे. फरक एवढाच की इथे विदूषकांना रंग नाही, पण मुखवटे आहेत; प्राणी नाहीत, पण पाळीव व्यवस्था आहे; आणि सूत्रधार नाही, कारण सगळेच सूत्रं ओढत आहेत.
राज्य सरकारात जे पक्ष एका माळेत माळलेले आहेत, तेच एका शहरात एकमेकांचे हात धरून मतं मागतात, तर दुसऱ्या शहरात तेच एकमेकांचे राजकीय गळे कापायला सज्ज असतात. इथे मित्र, तिथे शत्रू; पलीकडे भावंडं, त्याठिकाणी वारसदारांचे वाद; बाजूला युती, त्यापलीकडे युद्ध!! ही लोकशाही नाही—हा राजकीय बहुरूपी सापळा आहे.
मतदाराला विचारले तर त्याला कुणाशी भांडायचे, कुणाला निवडून द्यायचे, आणि कुणावर विश्वास ठेवायचा हेच समजेनासे झाले आहे. कारण आजचा पक्ष हा विचारधारेचा नव्हे, तर पोस्टरचा अवतार आहे. त्याचा रंग, आकार, घोषवाक्य, आणि शत्रू —
हे सगळे नगरपालिका-निहाय, पिन कोड नुसार बदलतात…..!!
एका शहरात सरकारचे भागीदार एकत्र उभे राहून म्हणतात, “आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत.” आणि दुसऱ्या शहरात तेच भागीदार एकमेकांवर भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे, अध:पतनाचे आरोप करीत असतात. म्हणजे विकास हा पिनकोडनुसार बदलणारा शब्द झाला आहे.
याहून मोठा विनोद म्हणजे—विरोधकही तितकेच लवचिक झाले आहेत. कालपर्यंत ज्यांना फॅसिस्ट, फसवे, लुटारू म्हणत होते, त्यांच्याशी आज हातमिळवणी करून मतदारांसमोर उभे राहतात. आणि उद्या पुन्हा त्यांच्यावर टीव्हीवर आरडाओरड करतील.यालाच राजकारण म्हणतात का? नाही. याला म्हणतात विचारधाराविना व्यावसायिक कुस्ती.
महानगरपालिका म्हणजे पाणी, सांडपाणी, वाहतूक, हवा, आरोग्य, शाळा, झोपडपट्ट्या—म्हणजे माणसाच्या रोजच्या जगण्याची शस्त्रक्रिया करणारी संस्था. पण या निवडणुकांमध्ये शहर हा विषयच नाही. विषय आहेत फक्त कोण कुणाच्या विरोधात उभा आहे, आणि कोण कुणाला फसवत आहे.
आज एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मत मागतात, आणि शेजारच्या शहरात त्याच उमेदवाराच्या नेत्याला गद्दार म्हणतात. हे मतदारांना मूर्ख समजण्याचे राजकीय शास्त्र आहे. जणू मतदारांना स्मरणशक्ती नसते, विवेक नसतो, आणि उद्या सोशल मीडियावर हेच चेहरे दिसणार नाहीत, असे गृहीत धरले जाते.
या विचित्र राजकीय गणितात शहरं मात्र बकाल होत चालली आहेत. पाणी नाही, हवा विषारी, वाहतूक ठप्प, झोपडपट्ट्या वाढत आहेत. पण राजकीय पक्षांना याच्याशी काही देणं-घेणं नाही, कारण त्यांचे आघाडीचे सूत्र हे शहर नव्हे—सत्ता आहे.
आज महाराष्ट्रात अशी स्थिती आहे की सरकारातील मित्र, निवडणुकीत शत्रू; विरोधक, निवडणुकीत सोबती; आणि मतदार—फक्त आकडेमोडीचा कच्चा माल.
ही लोकशाही नाही. ही राजकीय कुबड्यांवर चालणारी सत्ता-यंत्रणा आहे.
जेव्हा आघाड्या विचारांवर नव्हे, तर स्वार्थावर उभ्या राहतात, तेव्हा महानगरपालिकांच्या निवडणुका नगरनियोजनासाठी नसून, राजकीय रिअल इस्टेट व्यवहारांसाठी होतात.
आणि मतदार? तो फक्त एका विचित्र नाटकातला निःशब्द प्रेक्षक असतो—ज्याच्याकडून टाळ्या हव्यात, प्रश्न नाहीत.
महाराष्ट्रातील या २७ महानगरपालिका निवडणुका इतिहासात “लोकशाहीचा बहुरूपी तमाशा” म्हणून नोंदवल्या जातील. कारण इथे पक्ष बदलले, युती बदलल्या, शत्रू बदलले — पण शहरं मात्र तशीच उद्ध्वस्त राहिली.
-महेश झगडे









































