सत्तानाट्यावर भाजप कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी

0
386

भाजप वाढणार की राष्ट्रवादी…, भाजप कार्यकर्त्याचा देवेंद्र फडणवीस यांना रोकडा सवाल

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – राज्यातील सत्ता नाट्यात आपले भवितव्य धोक्यात आल्याने पिंपरी चिंचवड परिसरातील भाजप कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. घरच्या भाकरी मोडून ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला आता त्यांचीच पालख उचलायची वेळ आल्याने आमचे काय, असा रोकडा सवाल काही कार्यकर्त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र लिहून केला आहे. देवेंद्रजी, या राजकारणात खरोखर भाजप वाढणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसलाच फायदा होणार, याचेही उत्तर या कार्यकर्त्याने मागितले आहे.

भाजपचे मुळशी तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ गंगाराम पारखे यांनी दोनच दिवसांपूर्वी पाच महत्वाचे प्रश्न असणारे पत्र आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांना लिहीले आहे. गेली दहा वर्षे भाजपच्या माध्यमातून मुळशी आणि जिल्ह्यात अखंडपणे अत्यंत निष्ठापूर्वक काम करणारे नवनाथ पारखे हे सत्तानाट्यावर नाराज आहेत.

अत्यंत तळमळीने लिहीलेल्या या पत्रात पारखे म्हणतात, महाराष्ट्रात यापूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या काळातील सत्तानाट्य पाहिली, परंतु चालू घडामोडीतले हे सत्तानाट्य पाहून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. मी व्यक्तीशः तुमचा फॅन आहे, पण या राजकारणाबद्दल काही प्रश्न निर्मिण होतात त्याचे उत्तर मिळावे.

नवनाथ पारखे यांनी पाच प्रश्न उपस्थित केलेत. त्यात,

१) अजितदादा आणि त्यांचे सहयोगी यांना सत्तेत सामावून घेऊन राष्ट्रवादीची ताकद वाढेल की भाजपची…

२) आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे आपण वाली आहात, मग आम्हाला ताकद देणे आपले काम नाही का ?

३) वेळ पडेल त्यावेळी जेवणाची शिदोरी घेऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला, मग आमच्या सारख्या कार्यकर्त्याचे संघटनेत महत्व काय ?

४) मोठ्या साहेबांची जीरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची तर जीरवणार नाही ना ?

५) भाजपचे मंत्री पदाचे शर्यतीतील सहयोगी आमदारांचे काय ? ज्यांनी आजवर पक्षासाठी खूप काही केलय ? या प्रश्नांचे लेखी उत्तर नवनाथ पारखे यांनी मागितले आहे.