सत्तांतरानंतर प्रदेश भाजपाची पहिली बैठक पनवेलमध्ये

0
260

मुंब्ई, दि. २१ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापलथ बघायला मिळाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या सुमारे 40 बंडखोर आमदारांच्या साथीने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे.

दरम्यान, सत्तांतरानंतर आणि राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (ता.२३ जुलै) रोजी पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजपा प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध मोर्चा आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य, असे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित राहतील. बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्षांच्या संबोधनाने होईल तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप होईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार असून ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळविल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजपा-शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील. शेतीविषयक प्रस्ताव भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत राजकीय सद्य स्थितीबद्दल चर्चा होणार असून आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.