सतीश काळे अटकेवर सामाजिक संस्थांनी व्यक्त केला संताप

0
710

भिडेच्या अटकेवरून दिलेल्या इशाऱ्यानंतर गृहमंत्र्यांची सूडबुद्धीने कारवाई

काळे यांची जमिनावर मुक्तता

पिंपरी,दि.१७(पीसीबी) – स्वातंत्र्याच्या बाबतीत देश विरोधी वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली होती. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांनी संभाजी भिडे यांना पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला होता. त्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेणे अपेक्षित असतानाही त्यांनी घेतली नाही. तसेच पोलिसांकडून चुकीचे वक्तव्य करणाऱ्या भिडे वर कारवाई करण्याऐवजी काळे यांच्यावरच कारवाई करण्यात आली. एक दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. सध्या काळे जामिनावर बाहेर आले असून त्यांच्यावर सूडबुद्धीने झालेल्या कारवाई विरोधात सामाजिक संघटना संताप व्यक्त करत आहेत.

देशविरोधी, जाती धर्मामध्ये द्वेष पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल न करुन भिडेला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांना 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा नैतिक अधिकार नाही.मंत्र्यांनी ध्वजारोहण केल्यास आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला सतीश काळे यांनी दिला होता. यावेळी वाकड पोलिसांनी सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता काळे यांना ताब्यात घेऊन 151 (3) प्रतिबंधक कारवाई करून अटक केली. एक दिवस तुरुंगात बंदिस्त ठेवण्यात आले. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी न्यायालया समोर हजर करण्यात आले. या वेळी काळे यांची न्यायालयात जामिनावर सुटका झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून संभाजी भिडे बेताल वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण करत आहे. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. विविध सामाजिक संघटना देखील त्याबाबतीत निवेदने,आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व राज्य शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवत आहेत. मात्र त्याची दखल पोलीस प्रशासन घेताना दिसत नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात देखील संभाजी भिडे वर आम्ही कारवाई करू, अशा केवळ गप्पाच मारल्या. प्रत्यक्षात कारवाई वेळी त्यांनी हात वर केल्याचे दिसते. याउलट सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस समाजद्रोही भिडेला पाठीशी घालत असल्याचे हे चित्र आहे. त्यात सूडबुद्धीतून सतीश काळे यांचे वर झालेली कारवाई ही देश विरोधी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला ताकद देणारी असल्याचा संताप सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

या वकिलांनी मांडली बाजू :-
सतीश काळे यांच्या बाजूने वकिलांच्या टीमने बाजू मांडत जामीन मिळवून देण्यात मदत केली.यामध्ये कायदेशीर मार्गदर्शक ऍड तोशिफ शेख,ऍड सर्वजीत बनसोडे,ऍड क्रांती सहाने,ऍड नितीन कांबळे,ऍड अरमान शेख,ऍड स्वप्निल गिरमे यांच्यासह अनेक वकिलांची टीम होती.

संभाजी भिडे यांना कायदेशीर कारवाई करून अटक करणे गरजेचे होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने माझ्या मागणीचा सकारात्मक विचार न करता माझ्यावरच कारवाई केली. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आजवर आंदोलने छेडत आहोत. देशाच्या विरोधात,महापुरुषांच्या विरोधात जे गैरसमज पसरवतील त्यांच्या विरोधात आमचा लढा संविधानिक मार्गाने सुरूच राहील. असं सतीश काळे म्हणाले आहेत.