सतिश गोरडे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार’ जाहीर

0
1

दि.१४(पीसीबी) -,ज्येष्ठ विधिज्ञ आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे यांना नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कविवर्य विठ्ठल वाघ व ज्येष्ठ साहित्यिक केशव देशमुख यांच्या शुभहस्ते सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ॲड. सतिश गोरडे यांची पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, विधिसाक्षरता, कैद्यासाठी मोफत कायदेविषयक साहाय्य, कौटुंबिक मोफत समुपदेशन आणि अन्य सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि सचिव पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.