सतरा वर्षांपूर्वीच्या कुकने केला विनयभंग

0
342

रावेत, दि. १८ (पीसीबी) – सतरा वर्षांपूर्वी घरात कूक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने महिलेला वारंवार फोन करून त्रास दिला. तिच्या पतीला मेसेज व फोन करून महिलेची बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2021 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रावेत येथे घडला.

किशोर मोहंती (वय 45, रा. मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती सन 2003 मध्ये ठाणे येथे एका कंपनीत नोकरी करत होते. त्यावेळी ते कंपनीच्या गेस्टहाऊसमध्ये राहत होते. त्यावेळी गेस्टहाऊसमध्ये आरोपी किशोर हा कुक म्हणून काम करत होता. सन 2020 मध्ये किशोर याने फिर्यादींना अचानक फोन केला. त्यानंतर तो वारंवार फोन करू लागल्याने फिर्यादींनी त्याला फोन न करण्यास सांगितले व त्यांचा नंबर ब्लॉक केला. किशोर याने फिर्यादी यांच्या पतीला फोन करून फिर्यादींसोबत बोलण्याची जबरदस्ती केली. फिर्यादी बोलल्या नाहीत तर त्यांची बदनामी करणार असल्याची धमकी त्याने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.