सण- उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा – महेश लांडगे

0
312

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलावित. सण- उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे 27 लाख इतकी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायम सतर्क रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे सार्वजनिक सण-उत्सव साजरे झाले नाही. मात्र, यंदा सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे उत्सव होणार आहेत. परिणामी, प्रमुख बाजारपेठा, वर्दळीचे चौक, सार्वजनिक कार्यक्रमांची ठिकाणांवर महिलांसह अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आश्यकता आहे.

सध्यस्थितीला गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनसाखळी चोरी, छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून नवरात्रोत्सवासह सण- उत्सावाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला पोलीस, अधिकारी यांची गस्त वाढवणे अपेक्षीत आहे. मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चुकीच्या कृत्यांवर ‘वॉच’ठेवला पाहिजे. त्यासाठी नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार लांडगे म्हटले आहे.

नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा उत्सव असल्याने महिलांची संख्या अधिक असते. देवीच्या आरतीनंतर खेळला जाणारा ‘गरबा’ तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. पोलिस यंत्रणेकडून वेळेची बंधने शिथिल झाल्यास रात्री उशिरापर्यंत गरबा रंगतो. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक, विशेष पथकांची नेमणूक करण्याबाबत कार्यवाही करावी. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात यावी. त्यामध्ये उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था तसेच महिला सुरक्षेबाबत कार्यवाहीचे धोरण ठरवणे अपेक्षीत आहे, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.