सडलेला कोबी फ्रिजमध्ये ठेवल्याचा जाब विचारल्याने कुकने आवळला हॉटेल मालकाचा गळा

0
373

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – सडलेला कोबी फ्रिज मध्ये का ठेवला असे कुकला विचारले असता त्याने हॉटेल मालकाचा गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी सॉलिटर हॉटेल, हिंजवडी येथे घडली.

क्रिशांत राजीव अगरवाल (वय 30, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरहरी गिरधारी मंडल (वय 30, रा. कोलकाता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हिंजवडी फेज दोन येथे सॉलिटर नावाने हॉटेल आहे. त्यात आरोपी गौरहरी हा कुक म्हणून काम करतो. त्याने सडलेला कोबी फ्रिज मध्ये ठेवला, त्यामुळे फिर्यादी यांच्या आईने आरोपीला विचारणा केली. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांची कॉलर धरून त्यांना माझा आत्ताच्या आत्ता पगार करा, नाहीतर मी तुमचा खून करीन अशी धमकी दिली. तसेच त्याने फिर्यादींचा गळा हाताने दाबला. हॉटेल मधील कामगारांनी हे भांडण सोडवले. फिर्यादी यांच्या वडिलांनी आरोपीला समजावून सांगितले असता त्यांच्यावर देखील आरोपी लाकडी बांबू घेऊन धावून गेला. त्यांचीही गचांडी धरून गळा दाबला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.