सकाळी नऊ वाजता टिव्ही लावला की….

0
385

वर्धा, दि. ५ (पीसीबी) : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे भाजपसह शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर राऊत टीका करत असतात. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना मिश्किल टोला लगावला आहे. तसेच विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपये देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे वर्धा येथील 96 व्या मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी काय करतात असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण आम्ही राजकारणी साहित्यिकांची प्रेरणा आहे. कारण आमच्यातील अनेक राजकारणी कवी आहेत, कथाकार आहेत. तसेच आम्ही नसतो तर व्यंगचित्रं कुणावर काढली असती असा सवालही उपस्थित केला.

याचवेळी राजकारणात आमच्यातलाही साहित्यिक ओसंडून वाहत असतो. सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की, आमच्यातील साहित्य ओसंडून वाहतं असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला. त्यामुळं थोडी जागा आम्हांला मिळाली की, ती थोडीशी जागा कशी व्यापून टाकायची ते आम्हांला चांगलं जमतं असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले.

सोशल मीडियामुळं नवीन माध्यमं तयार झालं आहे, मात्र, त्याला उंची आणि खोली नाही.पुस्तके आपल्यापर्यंत साहित्य पोहचवतात.इतकी साहित्य संमेलनं होतात. पण ही सगळी साहित्य संमेलनं साहित्याला, विचारला समृद्ध करतात. त्यामुळं साहित्य परंपरा महत्त्वाची आहे.साहित्य संमेलन उणिवा नाही तर जाणीवा सांगणारे असते.