सकल ब्राम्हण समाजाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा

0
28
  • हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठींबा देण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे समाजाला आवाहन
  • संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांना दिले पाठींब्याचे पत्र

चिंचवड, दि.१० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांची भेट घेत त्यांना पाठींब्याचे पत्र दिले.

याप्रसंगी भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेविका सुनीता तापकीर, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, सकल ब्राम्हण समाजाचे समन्वयक परीक्षित कुलकर्णी, डॉ. शर्वरी येरगट्टीकर, अनिल शर्मा, रोहन जोशी, अभय ओरपे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व ब्राम्हण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना समन्वयक कुलकर्णी म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने केंद्रस्थानी ठेवला आहे व हीच ब्राह्मण समाजाची देखील भूमिका आहे. आम्ही खालील सर्व ब्राह्मण संस्था, संघटनांचे पदाधिकारी हिंदुत्वाचा जयघोष व्हावा या हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या चिंचवड विधानसभेतील शंकर जगताप, पिंपरी विधानसभेत आण्णा बनसोडे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे या तिघांनाही जाहीर संपूर्ण पाठिंबा देत आहोत.

हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेवून अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला ब्राह्मण समाज आहे. या समाजाप्रती अत्यंत चांगली अशी सकारात्मक वागणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यात सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळ दिले तर नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ देखील दिले आहे. भविष्यातही महायुतीचे सरकार ब्राम्हण समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असेल, असा विश्वास मी देतो.