सई ताम्हणकर च्या हस्ते स्वच्छता पंधरवड्याचा प्रारंभ

0
257

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिकेसह नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून नागरिक आपली जबाबदारी पार पाडत असून शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका कटीबध्द आहे. स्वच्छ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सफाई कर्मचारी मित्र यांच्यासह शहरातील नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेच्या वतीने “इंडियन स्वच्छता लीग २.०” अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज सकाळी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र, अप्पू घर प्रवेशद्वार, निगडी येथे सेवा सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे,उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, राजेंद्र शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी- कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेवून शहर स्वच्छ ठेवण्याबाबत आपल्या पालकांना जागरूक केले पाहिजे. इंडियन स्वच्छता लीगमध्ये ‘पीसीएमसी पायोनिअर्स’ हा आपला संघ शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सज्ज आहे. सगळ्यांनी या संघाचे प्रतिनिधित्व करून शहराच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी विजयाचा इंद्रधनुष्य पेलला पाहिजे, असेही ते म्हणाले.

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, जिथे स्वच्छता असते तेथील नागरिकांचे आरोग्य आनंदाने निवास करते. परदेशातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण झाली, त्यांनी ती जोपासली. त्यामुळे त्यांची शहरे स्वच्छ आहेत. आपली शहरे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येकाने याची सुरूवात स्वत:पासून केली पाहिजे. ही स्वच्छतेची परंपरा अशीच पुढच्या पिढीपर्यंत गेल्यास लवकरच आपला देश आणि आपले शहर स्वच्छ, सुंदर होण्यास वेळ लागणार नाही.

यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियान ब्रॅन्ड ॲम्बेसिडर राष्ट्रीय कबड्डीपटू पुजा शेलार तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन महिला अध्यक्षा संगिता किशोर जोशी- काळभोर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी- कर्मचारी आणि परिसरातील नागरिक यांनी स्वच्छता मोहीम राबवून ओला व सुका कचरा संकलित करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

दरम्यान, सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व वॉर्डमध्ये शुक्रवार १५ सप्टेंबर २३ रोजी इंडियन स्वच्छता लिग २.० अंतर्गत घरोघरी जावुन सहभागकर्ते यांचे रजिस्ट्रेशन, प्रभातफेरी, स्वच्छता शपथ व पथनाट्य इ.आयोजन करण्यात आले. यामध्ये अंदाजे २००० नागरिकांनी इंडियन स्वच्छता लिग २.० रजिस्ट्रेशन केले असुन नागरिक व युवकांनी https://innovateindia.mygov.in/islseason2/ या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अभियानाच्या दुस-या भागामध्ये १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन करणेत येणार आहे. महानगरपालिका तसेच संस्थेच्या सर्व स्वच्छता विषयक कामकाज करणा-या कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी करावयाची आहे. यामध्ये साधारण ३ ते ४ हजार कर्मचारी यांची महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.