सई ताम्हणकरला ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

0
400

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. ती नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला सलमान खान, विकी कौशल, ऐश्वर्या बच्चन, अनन्या पांडे, सई ताम्हणकर यांसह इतर कलाकारांनी हजेरी लावली. यात सई ताम्हणकर हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. यामुळे सर्व मराठी कलाकारांची तसेच प्रेक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे.