“संस्कार भारतीच्या अभिवाचनाने रसिक मंत्रमुग्ध”

0
5

“अभिवाचन ही काळाची गरज..

चिंचवड, दि. 24 (पीसीबी) –
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती नाट्यविधाच्या वतीने आयोजित नाट्याभिवाचन अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला.

साहित्यिक ,व्याख्याते राजेंद्र घावटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्योजक अभय पोकर्णा, कवयित्री मीना पोकर्णा, संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र आमले, प्रफुल्ल भिष्णूरकर, सचिव लीना आढाव, प्रचिती भिष्णूरकर आणि अनेक नाट्यरसिक या प्रसंगी उपस्थित होते.

नाट्यविधा संयोजक संजय चांदगुडे यांनी “धुम्रवर्ण मम्मीपप्पा व रिंकी” या लघुकथेचे अभिवाचन केले. मनोज कोल्हटकर लिखित व संजय चांदगुडे दिग्दर्शित अथांग या नाटकाच्या एका प्रवेशाचे अभिवाचन सौ.सुनिता बोडस, मंदार फाकटकर आणि सारंग चिंचणीकर यांनी केले.
उत्तम अभिवाचन करून सर्व कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवत मंत्रमुग्ध केले.

प्रमुख पाहुणे राजेंद्र घावटे म्हणाले की , “मराठी रंगभूमीला मोठा इतिहास आहे. आजही मराठी नाटकांचे साहित्यातील महत्व अबाधित आहे. प्रायोगिक, हौशी रंगभूमी आणि ग्रामीण लोककलावंत यांनी नाट्यचळवळ जिवंत ठेवली आहे. नाटक, लोकनाट्य, एकांकिका, महानाट्य आदींच्यामुळे मनोरंजनाबरोबरच व्यापक समाजप्रबोधन घडून येते. अभिवाचनामुळे अभिनय व वाचन या कलांचा उत्तम समन्वय साधला जातो. शब्दनिवड, शब्दफेक आणि अभिनय यातून श्रोत्यांच्या मनाचा ठाव कमीत कमी वेळेत घेता येणे हेच अभिवाचनाचे वैशिष्टय आहे. काळाची गरज ओळखून अभिवाचनाची चळवळ व्यापक होण्यासाठी संस्कार भारतीची नाट्यविधा उत्तम काम करत आहे. नाट्यभिवाचन ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे.”

नरेंद्र आमले यांनी प्रास्ताविक केले, सहसचिव सौ.आसावरी बर्वे यांनी ध्येयगीत सादर केले, व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. निर्मला नाईक यांनी कलाकारांचा परिचय करून दिला, तर संजय चांदगुडे यांनी आभार प्रदर्शन केले.