संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी बालसंस्कार वर्गाची गरज – किसनमहाराज चौधरी

0
41

निगडी, दि. ०३ (पीसीबी) : हल्ली जिकडे तिकडे नवरा बायको आणि एक मुल अशी त्रिकोणी कुटुंबे पहायला मिळतात. त्यातही अनावश्यक अशा भौतिक गरजा भागविण्यासाठी नवरा-बायको दोघेही नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतात. यामुळे असे आईबाबा मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. या परिस्थितीत लहान मुलांना वळण लावणे, आई, वडील, शिक्षकांचा सन्मान ठेवणे, शुर पुरुषांच्या तसेच जीवनमूल्ये उंचावणाऱ्या कथा सांगीतल्या जात नाहीत. श्लोक, प्रार्थना पाठांतर तसेच सदाचाराचे शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात. या मुलांना संस्काराचे बाळकडू देऊन चारित्र्यवान व देशभक्त पिढी घडवण्याचे काम बालसंस्कार वर्ग करीत आहेत.” असे प्रतिपादन ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी विश्व हिंदु परिषदेच्या सिंधुनगर येथील बालसंस्कार केंद्राच्या वर्धापनदिनी केले. यावेळी त्यांनी गोष्टींच्या माध्यमातून उपस्थितांना संस्काराचे व कुटुंबातील सुसंवादाचे महत्त्व समजून सांगितले. ते म्हणाले “मुल ही पालकांचे अनुकरण करीत असल्याने पालकांनी सदैव जागरूक राहून आदर्श जीवनशैली अनुकरायला हवी.”

विश्व हिंदु परिषद- मातृशक्तीच्या प्रांत सहसंयोजिका व या वर्गाच्या पालक सौ. शारदा रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विश्व हिंदु परिषदेची स्थापना, तात्कालीन परिस्थिती या बरोबरच साठ वर्षातील वाटचाल, विविध विभाग व सेवाप्रकल्पांची माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या “विश्व हिंदु परिषदेच्या अनेक विभागांपैकी मातृशक्ती या विभागांमार्फत देशपातळीवर सत्संग व बालसंस्कार चालवीले जातात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार वर्ग तर कौटुंबिक स्वास्थ्यासाठी सत्संग अत्यंत आवश्यक आहे.”

या वेळी केंद्रातील मुले श्रीकृष्ण, राधा, अहिल्यादेवी, आदींच्या वेशभूषेत आली होती. मुलांनी आपापले सादरीकरण करताना भग्वद्गगीतेतील अध्याय, मनाचे श्लोक म्हटले. तसेच ध्यान धारणेची माहिती, आदर्श दिनचर्या याची माहिती सांगीतली. यातील काही मुलामुलींनी वाढदिवस हा आनंद देणारा व वाढविणारा असायला हवा, त्यानिमित्ताने वृक्षारोपण करावे, आईबाबा, गुरुजणांसह थोरामोठ्यांचे आशिर्वाद घ्यावेत अस सांगून मंगलमय वातावरणात यज्ञ करुन साजरा करण्याचा आग्रह धरला. त्याबरोबर यज्ञाचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले. या प्रसंगी दत्तमंदिराचे अध्यक्ष अभय पंचपोर यांचेसह पालकही उपस्थित होते.
या संस्कार केंद्राच्या संचालिका सौ. अनिता फुलारे यांना पालकांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्कार केंद्रातील सर्व मुलांनी गायलेल्या सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.