संसदेत अधिवेशन सुरु असताना धुराच्या कांड्या फोडल्या…!

0
289

दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितलं की, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

खासदार दानिश अली म्हणाले, “तानाशाही नहीं चलेगी” (हुकूमशाही चालणार नाही) अशा घोषणा हे दोघे देत होते. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरचे कोणीतरी खासदार आहेत त्यांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावलं आहे.

नेमकं काय घडलं?
हे दोन जण सभागृहात धावत असताना खासदारांनी त्यांना पकडलं. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढलं आणि सभागृहात धूर पसरू लागला. त्यांनी स्मोक कँडलचा वापर केला असावा असं सांगितलं जात आहे. त्याचवेळी खासदारांनी या दोघांना पकडून चोप दिला. त्यापैकी एकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रतापराव सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.