संसदेचा भित्रा ससा करून ठेवलाय…

0
475

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – काही शब्द असंसदीय ठरवणं, संसदेच्या आवारात आंदोलन, निदर्शनांना मनाई करणं यावरुन आता शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हुकुमशहा डरपोक असतो, चार गाढवं एकत्र चरत असली तरी भीती वाटते, अशी टीका सेनेने शिवसेनेचं मुखपत्र सामनातून केली आहे. अशा बंदीमुळे संसद हे आता जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पाडणारे सभागृह राहिलेलं नाही असा टोलाही शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. शिवसेनेच्या या जहरी टीकेचे बाण भाजपाच्या जिव्हारी लागणारे आहेत.

संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. वास्तविक, सत्ताधाऱ्यांवर शब्दांची शस्त्रे भाजपाने जेवढी चालवली तेवढी कोणीच चालवली नसतील. लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे. आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
भारतीय संसद अधिक सभ्य आणि सुसंस्कृत करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली दिसते. सरकारने ‘असंसदीय’ शब्दांची नवी यादी जाहीर केली आहे. जयचंद, शकुनी, जुमलाजीवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशाह, विनाश पुरुष, कालाबाजारी असे मजबूत शब्दभांडार संसदेत उधळण्यावर त्यामुळे निर्बंध येणार आहेत. सत्ताधारी बाकांवरील सदस्य हे गेल्या काही वर्षांपासून शिस्तीचे अजीर्ण झाल्याप्रमाणेच वागत आहेत. पण विरोधी बाकांवरील सदस्यांनीही या अमोघ शब्दशस्त्रांचा वापर करू नये यासाठी हा सगळा डाव रचण्यात आला आहे, असंही सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. जो पक्ष “आम्ही आणीबाणी व हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला” असे उठताबसता बोलत असतो त्यांनीच लोकशाही, स्वातंत्र्य व संसदीय कार्यावर असा घाव घालावा? भाजपा प्रतिवर्षी आणीबाणीचे श्राद्ध घालण्याचा राजकीय सोहळा साजरा करते. त्या सोहळ्याच्या बरोबरीने आता संसदेच्या सध्याच्या अवस्थेचेही तेरावे घालून मोकळे व्हा, अशी चीड जनतेतून प्रकट होताना दिसत आहे. ‘नव्या भारताचा नवा शब्दकोश’ असे वर्णन राहुल गांधी यांनी केले आहे ते योग्यच आहे. देशाच्या राजकारणात, समाजात आजही जयचंद आणि शकुनी आहेत. त्यास जबाबदार आपली समाज व्यवस्थाच आहे. भाजपास जयचंद, शकुनी अशा ऐतिहासिक शब्दांचे भाले का टोचावेत?,असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.