संशयास्पद बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स; चौकशीसाठी स्पेशल पथक नेमण्याची तटकरेंची मागणी

0
400

रायगड दि. १८ (पीसीबी) : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरील समुद्रात एक संशयास्पद बोट सापडली आहे. या बोटीत तीन AK-47 आणि बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही बोट स्थानिक मच्छिमाराला दिसली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने बोट खेचून किनाऱ्यावर आणली आणि तपास सुरु केला. बोटीत एक मोठा बॉक्स होता, ज्यात तीन एके-47 आणि गोळ्या सापडल्या. या गोळ्या निळ्या आणि लाल रंगाच्या छोट्या पेटीत ठेवल्या होत्या. याबाबत आता स्थानिक आमदार आणि माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अदिती तटकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल पथक नेमण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या घटनेनंतर स्थानिक लोकांची सुरक्षा महत्त्वाची झाली आहे. गणपती काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे येथे नागरिकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच या घटनेची तातडीने एटीएसमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बॉक्समध्ये शस्त्रे ठेवण्यात आली होती, त्यावर इंग्रजीमध्ये नेपच्यून मेरीटाइम सिक्युरिटी असे लिहिले आहे. ही कंपनी ब्रिटनची असल्याचे सांगितले जाते. पोलीस या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिक माहिती घेत आहेत. या बोटीच्या मालकाशी संपर्क झाला आहे. दुबईतील एका सुरक्षा एजन्सीने सांगितले की या बोटीतील शस्त्रे त्यांचीच आहेत. ती गायब झाली होती. तसेच ही शस्त्रे बोटीवरील क्रू मेंबर्सच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचे या एजन्सीने स्पष्ट केले आहे.