पिंपरी, दि. ४ – ‘संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे मंगळवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी केले. महात्मा फुले महाविद्यालयाचा इतिहास विभाग, आय क्यू ए सी आणि दर्द से हमदर्द तक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान गौरव विशेष व्याख्यानात ॲड. सतिश गोरडे बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तसेच साहित्यिक प्रदीप गांधलीकर, प्रा. डॉ. संगीता अहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे आणि पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अस्तित्वात आले असले तरी त्यापूर्वी सुमारे तीन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर मसुदा समिती त्यावर काम करीत होती. सलग १४१ दिवस उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाला सजीव करण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले. ज्याप्रमाणे दूध हे प्रक्रिया केली नाही तर नासून खराब होते, त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांना जर समान न्याय मिळाला नाही तर लोकशाहीतील अंतर्गत असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो, याची जाणीव त्यांना होती. संविधानातील ३९५ कलमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता, बंधुभाव आणि देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी योगदान दिले. पुढे परिस्थितीनुरूप त्यामध्ये कलमांची संख्या वाढविण्यात आली; तसेच बहुमताने घटनादुरुस्तीही करण्यात आली आहे. देश आता संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना संविधानाचा आदर अन् सन्मान राखून प्रत्येक भारतीयाने मूलभूत हक्क उपभोगताना नैतिक कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे!’ दृष्टान्तकथा आणि विविध उदाहरणे उद्धृत करीत ॲड. गोरडे यांनी विद्यार्थ्यांसहित सर्व उपस्थितांना संविधानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सतिश गोरडे हे आज ज्येष्ठ विधिज्ञ या भूमिकेतून संविधानावर व्याख्यानासाठी आले याचा विशेष आनंद वाटला. जातीय उतरंडीखाली चिरडल्या गेलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचे बळ संविधानाने दिले आहे!’ असे मत मांडले. प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रा. भाऊसाहेब सांगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. नीळकंठ डहाळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. संग्राम गोसावी आणि प्रा. डॉ. प्रतिमा कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संदीप नन्नावरे यांनी आभार मानले. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारीवर्ग, दर्द से हम दर्द तकचे ॲड ऋषिकेश शर्मा, ॲड आदित्य कोळपकर, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले