संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत दंगल, वाहनांती तोडफोड, लाठिचार्ज

0
52

परभणी, दि. ११ : मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या हाकेला हिंसक वळून लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन घेत, या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात आज परभणी बंद करण्यात आले होते. या बंदला हिंसक वळण लागले, आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली, तर काहींनी पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केल्याची घटना घडली. परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालं. एकूणच येथील आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून दंगा काबू पथकही रस्त्यावर उतरले आहे. शहरातील आर.आर. टॉवर परिसरामध्ये प्रचंड दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली. पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन हे आंदोलक शहरात फिरताना दिसले, विशेष म्हणजे बंद दुकानांवरही दगडफेक केली जात होती. त्यामुळे, पोलीस व सुरक्षा पथकांनी रस्त्यावर उतरुन सौम्य लाठीचार्ज केला आहे.

वसमतमध्येही भव्य मोर्चा
दरम्यान, परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्या घटनेच्या निषेधार्थ आज वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मोर्चा काढत आंबेडकरी जनतेच्यावतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. वसमत शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला होता, या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी जनता सहभागी झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जात आंबेडकरी जनतेच्यावतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.