संभाजीराजे यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही! – ह. भ. प. मानसी बडवे

0
19

पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव – तृतीय पुष्प

पिंपरी (दिनांक : ३० मार्च २०२५) ‘छत्रपती संभाजीराजे यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही; तर त्यापासून अनेक योद्धे अन् वीर यांनी प्रेरणा घेऊन स्वराज्याचे रक्षण केले!’ असे प्रतिपादन ह. भ. प. मानसी बडवे यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २९ मार्च २०२५ रोजी केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात ‘स्वराज्यरक्षकाची गाथा’ या विषयावरील संगीत व्याख्यानाच्या माध्यमातून मानसी बडवे यांनी तृतीय पुष्प गुंफले. मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चिंचवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानसी बडवे पुढे म्हणाल्या की, ‘अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अन् त्यातही आठ वर्षे स्वराज्यरक्षणासाठी रणांगणावर लढलेल्या संभाजीराजे यांचा इतिहास युगानुयुगे मांडला तरी कमीच आहे. संघर्ष हा शंभुराजे यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होता. आक्षेप आणि संस्कार यांनी त्यांचा इतिहास व्यापला असलातरी देह संपला तरी चालेल; पण धर्मांतर करणार नाही, हा त्यांच्या वज्रनिश्चयाचा इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे!’ जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा शंभुराजे यांचा जाज्वल्य इतिहास मांडताना बडवे यांनी अनुरूप अशा पदांचे गायन केले. विशेषत: धर्मासाठी अनन्वित अत्याचार सहन करून त्यांनी जे बलिदान दिले त्याचे हृदयद्रावक वर्णन ऐकताना श्रोते सद्गदित झाले. कौस्तुभ परांजपे (हार्मोनियम) आणि सिद्धार्थ कुंभोजकर (तबला) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमादरम्यान श्री शंकरमहाराज गोशाळेच्या अनिता जोगड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा फळांच्या रसाने अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कैलास गावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कैलास भैरट यांनी आभार मानले.