मुंबई, दि . २४ ( पीसीबी ) : राज्यातील शेतकऱ्यांसाठीची दिलासादायक बातमी आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे काल (शुक्रवारी दि. 23) तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतर झालं आहे. मात्र, अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेलं नाही. मात्र, या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 24 ते 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने रविवारी (दि. 25) अवघ्या राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल (शुक्रवारी) दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. ते पुढील 24 तासांमध्ये उत्तरेकडे सरकणार आहेत. त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दोन दिवसांत दाखल होईल. साधारण 25 मे पर्यंत दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
राज्यात उद्या (रविवारी,25 रोजी) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं धुमाकुळ घातला आहे. पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला आहे.राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक व नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असून पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.विदर्भातही पावसाचे वातावरण निर्माण झाले असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.