मुंबई, दि. ०२ (पीसीबी) : अमित शहांना स्वप्नदोष झालाय, याला स्वप्न दोष म्हणतात. संपूर्ण भारतीय जनता पक्षालाचा स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहे, त्यांनी संपूर्ण राष्ट्राचा विचार करावा. 2029 तर खूप दूर राहिलं, त्यापूर्वीही तुमचं सरकार राहील की नाही याबाबत विचार करा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं. 2029 मध्ये भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणेल, असं वक्तव्य अमित शाह यांनी मुंबईत भाजपच्या मेळाव्यात केलं होतं, त्यावरून राऊत यांनी शाह यांना टोला हाणलाय.
विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल आणि 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर केवळ भाजपच्या ताकदीवर स्वबळाची सत्ता येईल, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. त्यावरून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधाताना संजय राऊत यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवतानाच अमित शाह यांच्या या विधानाचाही समाचार घेतला.
2024 च्या निवडणुकीत तुम्ही 240 वर थांबलात, 2029 च्या निवडणुकीत भाजपा 140 च्या खाली पोहोचले. या निवडणुकीत तु्म्ही चोऱ्या , माऱ्या, लांडी-लबाड्या करून, थोड्या जागा चोरल्यात. 2029 ला ते शक्य होणार नाही, असं राऊत यांनी सुनावलं. विधासभेला महाराष्ट्रात, जम्मू-काश्मीरमध्ये , हरियाणात तुमचा पराभव होतोय. पण स्वप्न पहायला काय हरकत आहे,? स्वप्न पाहणाऱ्यांवर ईडी, सीबीआय रेड टाकू शकत नाही ना.
भाजपने खुशाल स्वप्न पहावीत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतसुद्धा आमची सत्ता येत्ये, असं ते म्हणू शकतात. त्यांना कुणीही अडवलेल नाही. पण त्यांची सत्ता येण शक्य नाही. या देशातून भारतीय जनता पक्षाचं अध:पतन सुरू झालं आहे, अशा शब्दांत राऊतांनी शाह यांना फटकारलं.
गेल्या अडीच वर्षांपासून प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची कशी लूट होत्ये ते आपण पहात आहोत. त्यांना महाराष्ट्र, मराठी माणूस खतम करायचा आहे. या दोघांना महाराष्ट्राचा स्वाभिमानी कणा मोडून काढायचा आहे, असे सांगत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्राचा उरलासुरला स्वाभिमान खतम करून त्यांना हे राज्य गुजरातला जोडायचं आहे, ताब्यात घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील इंच इंच जमीन, संस्था , उद्योग हे अदानीच्या घशात घातलं जात आहे. ही संपत्ती जरी अदानींच्या नावावर असली, त्याचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.