‘संपत्ती इच्छापत्र करणे काळाची गरज!’ – ॲड. सतिश गोरडे

0
19

पिंपरी, दि . २४ ( पीसीबी ) – ‘संपत्ती इच्छापत्र करणे काळाची गरज आहे!’ असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी पिंपरी येथे बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी केले. महात्मा फुले महाविद्यालय, आय. क्यू. ए. सी. आणि दर्द से हमदर्द तक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन प्रसंगी ॲड. सतिश गोरडे बोलत होते. प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘आजच्या धकाधकीच्या, विज्ञान – तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत आहे, मात्र नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण लक्षवेधी झाले आहे. भाऊ – बहीण, वडील – मुलगा अशा विविध नात्यांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण होऊन न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे हे वाद टाळून आपले व आपल्या वारसदारांचे जीवन सुखकर करायचे असल्यास ‘संपत्ती इच्छापत्र’ करणे ही काळाची गरज आहे!’ महाविद्यालय विकास समिती सदस्य बाळासाहेब वाघेरे यांनी, ”संपत्ती इच्छापत्र’ या विषयावर महाराष्ट्रभर ॲड. सतिश गोरडे हे विविध ठिकाणी व्याख्याने देऊन समाजप्रबोधन करीत आहेत. सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी या प्रबोधनातून मोठी मदत होणार आहे!’ असे मत व्यक्त केले. प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आजच्या धावपळीच्या युगात मानवी जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. महापूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही मानवी जीवनाला धोका प्राप्त होत आहे, त्यामुळे इच्छापत्र सर्वांनी करावे!’ असे आवाहन केले.

कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डाॅ. सुहास निंबाळकर, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डाॅ. कामायनी सुर्वे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डाॅ. संगीता अहिवळे, पर्यवेक्षक प्रा. रूपाली जाधव, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. आशिष गोरडे, प्राध्यापक प्रबोधिनी चेअरमन प्रा. भाऊसाहेब सांगळे, आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक डाॅ. नीळकंठ डहाळे यांची उपस्थिती होती. प्रा. डाॅ. वैशाली खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल डाॅ. तृप्ती आंब्रे यांनी आभार मानले.