संधी मिळाल्यास भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करतात : ज्ञानेश्वर लांडगे

0
510

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या श्रेया आणि ऋतुजा यांची जपानच्या शिष्यवृत्ती साठी निवड

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) भारतीय विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन दिले तर ते विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करतात असे प्रतिपादन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सर्वच शाखांमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील आधुनिक व उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीच्या संधी मिळाव्यात यासाठी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये विविध प्रकल्प राबवले जातात. त्या अंतर्गत जपान सरकारच्या शिष्यवृत्ती योजना देखील राबविण्यात येतात. या शाळेत विद्यार्थ्यांना नेहमीच जगभरातील विविध भाषा शिकण्याचे प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून जागतिक स्तरावर पूर्ण आत्मविश्वासाने हि भावी पिढी भारतीय संस्कृती आणि बुद्धिमत्ता सिद्ध करून अतुलनीय कामगिरी करेल असा विश्वास पीसीईटीच्या विश्वस्तांना आहे असेही पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी श्रेया वाळुंजकर आणि ऋतुजा जोशी या दोघींची “आशिया काकेहाशी शिष्यवृत्ती २०२२” साठी निवड झाली आहे. १५ जूनला या दोघी जापान साठी रवाना होणार आहेत. त्यांना शुभेच्छा देताना ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते.

यावेळी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, आशिया काकेहाशीच्या एएफएस इंडिया शिष्यवृत्ती साठी आशियाई देशांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत आशियाई देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे हा उद्देश आहे. श्रेया वाळुंजकर ही विद्यार्थिनी एस. बी. पाटील मध्ये जापानी भाषा शिकली. भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर तीने साकुरा जापनीज या क्लास तर्फे जापानी भाषा शिकणे सुरूच ठेवले. ऋतुजा जोशी या विद्यार्थिनीने देखील जपानी भाषा शिकण्यास वर्षभर तयारी केली श्रेया आणि ऋतुजा या दोघींना भरतनाट्यम हा नृत्यप्रकार करण्याची आवड आहे. जपान आणि इतर आशियाई देशांमधील किशोरवयीन मुलांमध्ये आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण करणे केंद्रित आहे. भारतातून जापानमध्ये युवा प्रतिनिधी म्हणून आवश्यक असलेले वैयक्तिक आणि शैक्षणिक गुण पहिले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जपान सरकारद्वारे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत रहिवासी शिक्षणाची संधी दिली जाते.

श्रेया आणि ऋतुजा यांचा शाळेतर्फे पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी व उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.