संत विचार प्रबोधिनीची शाखा आता सिडनी मध्ये…

0
72

दि. ९ ऑगस्ट (पीसीबी) – मागीलवर्षीच्या वारीमध्ये आपल्या संत विचार प्रबोधिनी दिंडी मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी मधून श्री. नरेंद्र अंतुरकर काका सहभागी झाले होते. वारीला आले तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ त्यांनी पहिल्यांदाच म्हंटला. वारीच्या दरम्यान त्यांना हरिपाठाची इतकी गोडी लागली की हरिपाठ म्हणणे त्यांनी सिडनीला गेल्यावर देखील चालू ठेवले. यंदा काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना वारीमध्ये सहभागी होता आले नाही परंतु वारीच्या काळात त्यांनी त्यांच्या सिडनी येथील निवासस्थानी साधारण 30 ते 35 मंडळींना घेऊन 1 महिना रोज संध्याकाळी हरिपाठ म्हंटला. ह्या काळात हरिपाठाकरिता एकत्र झालेल्या मंडळींना देखील हरिपाठाची गोडी लागली आणि सर्वांच्या इच्छेनुसार काकांनी डॉ. भावार्थ देखणे यांच्याशी बातचीत करून “संत विचार प्रबोधिनी” ची पहिली शाखा सिडनी येथे स्थापन केली व त्याचा पहिलाच उपक्रम म्हणजे प्रति गुरुवारी एका सद्भक्ताच्या घरी जाऊन सामूहिक हरिपाठ म्हणायचा.


आज आपल्या दिंडीच्या सिडनी येथील शाखेचा पहिल्या गुरुवारचा हरिपाठ संपन्न झाला. हरिपाठाला 27 जण उपस्थित होते. डॉ. रामचंद्र देखणे आणि माई यांनी 25 वर्षांपूर्वी चालू केलेल्या संत विचार प्रबोधिनीची धुरा गतवर्षी देखणे सरांच्या दुःखद निधनाने डॉ. भावार्थ देखणे यांच्या खांद्यावर आली. अमेरिकेतुन शिकून आल्यावर डॉ. भावार्थ देखणे यांचे एकच उद्दिष्ट होते की आपल्या संतांचे विचार भारताबाहेर पोहोचवायचे. आज संत विचार प्रबोधिनीची प्रथम शाखा सिडनी येथे चालू झाल्यामुळे या उद्दिष्टाची मुहूर्तमेढ रोवली गेली. माऊलींच्या कृपेने ह्या लावलेल्या एका बीजाचे रूपांतर वटवृक्षात होवो व यामाध्यमातून आपल्या संतांनी दिलेली जीवनमूल्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचो हीच प्रार्थना. संत विचार प्रबोधिनी दिंडीला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. दिंडी रौप्यवर्षात पदार्पण करत असताना दिंडीची शाखा सिडनी येथे सुरू होणे हा आणखी एक दुग्धशर्करा योग…