दि. १ (पीसीबी) – संत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या कृपा-आशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे झोनचा भव्य बाल संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी १० ते १ या वेळेत पार पडलेल्या या समारंभात ३ ते १५ वयोगटातील २५०० हून अधिक बाल संत व त्यांचे पालक पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून सहभागी झाले. गीत, कविता, नाटिका व विचारांच्या माध्यमातून लहान बालकांनी सद्भावना, विशालता, समर्पण, विनम्रता व सहनशीलता यांसारख्या दैवी गुणांचा संदेश समाजात पोहोचवला.
या समागमाचे विशेष आकर्षण ठरली बाल प्रदर्शनी, या मध्ये “मनुष्य जीवनाचा उद्देश”, “अन्नाबाबत जागरूकता”, “मोबाईलचे तोटे”, “कणा-कणा तुन शिक्षा”, “मन की बात – AI रोबोट” या प्रात्यक्षिकद्वारे संत निरंकारी मिशन चा संदेश पोहोचवण्यात आला. समाजात वृद्धाश्रमांची वाढती संख्या या चिंताजनक विषयावर सादर झालेल्या नाटिकेतून पालकांविषयीची कृतज्ञता, कौटुंबिक मूल्यांचे आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तसेच मल्लखांब, तायक्वॉंडो, व्हॉलीबॉल, स्केटिंग, जिम्नॅस्टिक आदी खेळांमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या ३०० हून अधिक बालकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित असलेले आ. सखाराम लव्हटे (मुंबई) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पराविद्या ही परमात्म्याचे सत्यस्वरूप जाणण्याची विद्या आहे, जीवनाचा अंतिम उद्देश, आत्मा आणि परमात्मा यांचे नाते, मोक्षप्राप्तीचा मार्ग याची जाणीव करून देणारी विद्या म्हणजेच पराविद्या आणि ती केवळ संपूर्ण सद्गुरूंच्या शरणागतीतूनच प्राप्त होते. आज च्या धकाधकीच्या जीवनामध्ये आई-वडील अतिव्यस्त असल्यामुळे आपल्या मुलांसोबत वेळ घालवत नाहीत परंतु प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत वेळ व्यतीत केला पाहिजे. मुलांमध्ये लहानपणापासूनच भक्तीची ओढ निर्माण झाली तर त्यांचे जीवन आध्यात्मिकतेने समृद्ध होईल आणि ते समाजाचे सुजाण नागरिक बनतील.
या वेळी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सद्गुरूंच्या चरणी आशीर्वादाची कामना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी वाडकर व कुणाल सिंह यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले.