संत तुकाराम महाराज पालखीसाठी आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून २१ किलो चांदीचे दान

0
289

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या देहूबाहेरील पहिल्या मुक्कामाच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवडकरांची जोरदार तयारी सुरू आहे. या वारीतील दररोजच्या अभिषेक सामग्रीसाठी नवीन चांदीचा मखर, सिंहासन, पादुका, अभिषेक पात्रासाठी पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी २१ किलो चांदी नुकतीच अर्पण केली.

या दानातून घडविण्यात आलेले नवे अभिषेक साहित्य शनिवार (१८ जून) रोजी सकाळी पूजा करून संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे व इतर विश्वस्तांकडे सुपूर्द केले जाणार आहे.
नितीन महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व देहू संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. माणिक महाराज मोरे, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प संजय महाराज मोरे, ह. भ. प मधुकर महाराज मोरे यांना नुकतीच ही चांदी बनसोडे यांनी अर्पण केली होती. या दानाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या वारकऱ्यांची सेवा होत असल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त करीत स्वतःला भाग्यवान म्हटले होते.

या चांदीतून घडविण्यात आलेल्या अभिषेक सामग्रीची पालखीचा मुक्काम असलेल्या शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते बनसोडे यांच्या काळभोरनगर, आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयापर्यंत शनिवारी सकाळी दिंडी काढण्यात येणार आहे. नंतर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष चैतन्य महाराज देगुलकर, ह. भ. प गहनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह इतर कीर्तनकार महाराजांचे मार्गदर्शन व आशीर्वादपर प्रवचन होणार आहे. या अर्पण व पूजन सोहळ्याच्या तयारीची आज बैठक झाली.